यशवंत जाधव यांनी रोखीने खरेदी केले 6 कोटींचे दागिने - पुढारी

यशवंत जाधव यांनी रोखीने खरेदी केले 6 कोटींचे दागिने

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : प्राप्तीकर खात्याकडून सुरु असलेल्या सततच्या कारवाईमुळे शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांचा पाय दिवसेंदिवस आणखी खोलात जात आहे. या खात्याने केलेल्या तपासात यशवंत जाधव यांनी काही ज्वेलर्सकडून 6 कोटींचे दागिने रोख रक्कम देऊन खरेदी केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, प्राप्तीकर खात्याने यशवंत जाधव यांच्या आणखी 12 मालमत्तांवर टाच आणली आहे.

मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या घर, कार्यालये अशा मालमत्तांवर काही महिन्यांपूर्वी प्राप्तीकर खात्याने छापेमारी केली होती. तेव्हापासून त्यांच्या मालमत्तेचा तपास सुरु आहे. प्राप्तीकर खात्याने यशवंत जाधव यांच्याशी संबंधित 41 मालमत्ता जप्त केल्या आहेत. भायखळ्यातील 31 फ्लॅट्स आणि वांद्रेतील 5 कोटींचा फ्लॅटचा यात समावेश होता.

बिलाकाडी चेंबर्समध्ये 3 खोल्यांचे टेनन्सी राईटस खरेदी करण्यासाठी यशवंत जाधव यांनी 1.15 कोटी रुपये रोखीने दिल्याचेही प्राप्तीकर खात्याच्या तपासात उघड झाले आहे. सोबतच कोरोनेशन बिल्डींग, झैनाब महाल आणि कैसर बिल्डींगमध्ये अचल संपत्ती हस्तांतरणासाठी 3 कोटींहून अधिक रक्कम रोखीने देण्यात आल्याचीही माहिती प्राप्तिकर खात्याला मिळाली आहे.

यशवंत जाधव प्रकरणात गेल्या 10 दिवसांत तपासाला वेग आला आहे. प्राप्तीकर खात्याने यशवंत जाधव यांच्या आणि 12 मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणात एकूण जप्त संपत्तींची संख्या आता 53 वर पोहचली आहे. यशवंत जाधव यांनी काही ज्वेलर्सकडून 6 कोटींच्या दागिन्यांची खरेदी केली. ही खरेदी संपूर्ण रक्कम रोखीने खरेदी केली, अशीही माहिती आहे.

Back to top button