पूर्व द्रुतगती मार्ग 24 पर्यंत मंदगती! | पुढारी

पूर्व द्रुतगती मार्ग 24 पर्यंत मंदगती!

विक्रोळी ; पुढारी वार्ताहर : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने शुक्रवारपासून जेव्हीएलआर पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने शनिवार सकाळपासून पूर्व द्रुतगती मार्ग मंदगती होत प्रचंड वाहतूक कोंडी सुरू झाली. ठाण्याकडे जाणार्‍या वाहिनीवर जेव्हीएलआर पूल ते घाटकोपर पुलापर्यंत दोन ते तीन किलोमीटर वाहनांची लांबच लांब रांग लागली.

जेव्हीएलआर पूल दुरुस्तीसाठी 24 तारखेपर्यंत म्हणजे तब्बल 10 दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने तोपर्यंत पूर्व द्रुतगती मार्गाची वाहतूक कोंडी अटळ आहे.

ठाणे, मुंबई उपनगराला मुंबई शहराशी जोडणार्‍या पूर्व द्रुतगती मार्गावर पूर्व उपनगराला पश्चिम उपनगराशी जोडणारा जेव्हीएलआर हा महत्त्वाचा पूल जुना झाल्याने त्याच्या बेअरिंग्स आणि जॉईंट्स बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा पूल बंद असला तरी बाजूच्या स्लिप रोडवरून वाहतूक सुरू आहे. मात्र, तो अरुंद असल्याने ही वाहतूक कोंडी सुरू झाली. त्याचा फटका विक्रोळी कन्नमवारनगर आणि टागोरनगरमधील वाहतुकीलाही बसला.

पूर्व द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीमुळे 30 मीटरचे अंतर कापायलाही वाहनांना 15 मिनिटे लागत होती. घाटकोपर पूल ते विक्रोळी हे अंतर एरवी काही मिनिटांत कापता येते.आज मात्र हे अंतर कापण्यासाठी किमान एक तास खर्ची घालावा लागला.

या महामार्गावर कांजूरमार्गनजीक डम्पिंग ग्राऊंड आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचर्‍याच्या डंपरची वाहतूक सुरू असते. हे डंपरही अपेक्षित संख्येने डम्पिंग ग्राऊंडवर पोहोचू शकले नाहीत.

जेव्हीएलआर पूल बंद असल्याची वाहनचालकांना कल्पनाच नव्हती.त्यामुळे असंख्य वाहनचालक कोंडीत फसले.जे घाटकोपर पूल ओलांडून पुढे आले,त्यांना परतीचा किंवा पर्यायी मार्गच नव्हता.परिणामी त्यांना जेव्हीएलआरपर्यंत रखडपट्टी सहन करणे भाग पडले.

बिगर वातानुकूलित बस,टुरिस्ट गाड्या, रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करणार्‍या प्रवाशांना तर रखरखीत ऊन आणि वाहतूक कोंडी यामुळे प्रचंड मनस्ताप झाला. वाहतूक कोंडी आणि आसपास हॉटेल किंवा दुकाने नसल्याने पिण्याचे पाणीही उपलब्ध होत नव्हते.रुग्णवाहिकाही या कोंडीत अडकून पडल्या होत्या.

जेव्हीएलआरच्या खालून डावे वळण घेऊन पवई आणि पुढे पश्चिम उपनगरात जाता येते.मात्र जेव्हीएलआर पूल आणि त्याखालील रस्ता हा खूप चिंचोळा असल्याने प्रामुख्याने तेथे कोंडी झाली होती.शिवाय ठाण्याहून पश्चिम उपनगरात जाणार्‍या वाहनांची गर्दी याच ठिकाणी एकवटल्याने वाहने मोठ्या मुश्किलीने पुढे सरकत होती.

मार्गिका खुली केली नाही

ठाण्याकडे जाणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता,सीएसटीच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याची एम मार्गिका ठाण्याच्या दिशेने जाणार्‍या वाहनांसाठी खुली करणे अपेक्षित होते.शनिवार असल्याने सीएसटीला जाणार्‍या वाहनांची संख्या कमी होती.त्यामुळे हा प्रयोग करता आला असता.पण वाहतूक विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ते शक्य झाले नाही. असा प्रयोग यापूर्वी सायन पुलाच्या ठिकाणी झाला होता.

Back to top button