5 वर्षांत पावणेपाच हजार युनिट रक्तसाठा वाया | पुढारी

5 वर्षांत पावणेपाच हजार युनिट रक्तसाठा वाया

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईत गेल्या पाच वर्षांत एकूण 4 हजार 742 युनिट्स रक्त वाया गेल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. कोरोना महामारीच्या काळात म्हणजे 2019-2020 या वर्षात सर्वाधिक 2 हजार 631 युनिट्स रक्त वाया गेले, असे माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी सांगितले.

रक्त संकलन करताना रुग्णालये आठ दिवस पुरेल, इतका साठा ठेवतात. अनेकदा पुरेसा रक्तसाठा उपलब्ध होत नाही. रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता ध्यानात घेऊन रुग्णालये आधीपासूनच जास्तीचा रक्तसाठा करून ठेवतात. मात्र रुग्णालयांना या जादा रक्ताची गरज भासते अथवा त्याचा उपयोग करण्याची वेळ येतेच, असे नाही.

ही समस्या कोरोनाकाळापूर्वीही होती. त्यावर ठोस उपाययोजना करता येत नाही, असे राज्य रक्तसंक्रमण परिषदेचे संचालक अरुण थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहितीच्या अधिकाराखाली 2017 ते 2021 या पाच वर्षांत वाया गेलेल्या रक्ताबाबत तपशील मागितला होता. त्यावर, 2017 मध्ये 629 युनिट्स, 2018 मध्ये 627 युनिट्स, 2019 मध्ये 1310 युनिट्स, 2020 मध्ये 1321 युनिट्स, 2021 मध्ये 855 युनिट्स रक्त वाया गेल्याचे सांगण्यात आले. उन्हाळी सुटी लागल्यावर शहरांत रक्तसाठ्याचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून रक्तदानाचे आवाहन करण्यात येते. शिबिरांतून होणार्‍या रक्तदानातून हा तुटवडा भरून काढला जातो. मुंबईत 55 रक्तपेढ्या असून, सरकारी व महापालिकेच्या प्रमुख रक्तपेढ्यांमधील वाया गेलेल्या रक्ताची आकडेवारी देण्यात आली आहे.

महापालिकेच्या केईएम, कूपर, सायन, नायर, भाभा, राजावाडी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांमधील रक्त वाया गेलेे. राज्य सरकारच्या सेंट जॉर्जेस, जे.जे. महानगर रक्तपेढी, कामा रुग्णालायाचाही त्यात समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Back to top button