वेतनवाढ : नोकरदारांचा खिसा यंदा होणार गरम | पुढारी

वेतनवाढ : नोकरदारांचा खिसा यंदा होणार गरम

मुंबई ; पुढारी डेस्क : कोविड-19 महामारीच्या बाधेमुळे रुग्णशय्येवर पडलेल्या उद्योग-व्यवसाय क्षेत्रांची प्रकृती सावरत असल्याचे संकेत असून, वेतनकपातीचे ग्रहण सुटू लागल्याचे दिसते. महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये यंदा बर्‍यापैकी वेतनवाढ मिळेल आणि तिचे सरासरी प्रमाण 8.13 टक्के राहील, अशी सुवार्ता एका अहवालाने दिली आहे.

‘टीमलीज सर्व्हिसेस’ने प्रमुख 9 शहरे व महत्त्वाच्या 17 क्षेत्रांमधील 2 लाख 63 हजार कर्मचार्‍यांच्या वेतनमानाचा अभ्यास करून ‘द जॉब्स अँड सॅलरीज प्रायमर’ हा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यापैकी 14 क्षेत्रांमध्ये वेतनवाढीचे प्रमाण सरासरी 8.13 टक्के असेल. वेतनवाढीचा टक्का एक अंकीच असला, तरी गेल्या दोन वर्षांपासून नोकर्‍यांच्या बाजारावर आलेले पगारकपात आणि मंदीचे मळभ दूर होत असल्याची सुचिन्हे दिसू लागली आहेत, असे ‘टीमलीज सर्व्हिसेस’च्या सहसंस्थापक आणि कार्यकारी उपाध्यक्ष रितुपर्णा चक्रवर्ती म्हणाल्या. नियोक्ते अधिक सकारात्मक धोरण घेतील आणि वेतनवाढीचे प्रमाण लवकरच वाढून कोविडपूर्व स्तरावर जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विशेष म्हणजे, 12 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त वेतनवाढ मिळणार्‍या शहरांमध्ये मुंबई, पुणे, दिल्ली, बंगलोर, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद यांचा समावेश आहे. कोरोना महामारीने दिलेल्या तडाख्यातून बहुतेक क्षेत्रे सावरली असून, 17 पैकी 10 क्षेत्रांमध्ये वाढीचे प्रमाण 7 ते 10 टक्के झाले आहे. अन्य 7 क्षेत्रांनी 5 ते 7 टक्के वाढ नोंदवली आहे.

वेतनवाढीच्या टक्केवारीत ‘सेल्स’ (7.14%) आणि ‘आयटी’ (9.23%) विभागांतील नोकर्‍यांची आघाडी कायम आहे. त्याचप्रमाणे आरोग्यसेवा आणि फार्मास्युटिकल्स क्षेत्रातील संशोधन व विकास विश्लेषक (9.39%), माहिती तंत्रज्ञान आणि संबंधित क्षेत्रातील नेटवर्क इंजिनीअर (9.33%) आणि वाहन व पूरक उद्योगांमधील ऑटोकॅड इंजिनीअर (9.50%) या नोकर्‍यांच्या लाभदायकतेत झपाट्याने वाढ होत आहे.

‘नीश’ नोकर्‍यांची चांदी

सरसकट चांगली वेतनवाढ देण्यासंदर्भात नियोक्ते अद्याप फारसे औदार्य दाखवत नसले, तरी उच्च दर्जाचे कौशल्यास आणि त्यातही ‘नीश’ म्हणजे अत्यंत मोजका ग्राहकवर्ग असलेल्या उत्पादनांच्या क्षेत्रात मात्र त्यांनी मोकळा हात सोडल्याचेही दिसते. ‘सुपर-स्पेशलायझेशन’ आवश्यक असलेल्या नोकर्‍यांच्या बाबतीत उद्योजक-व्यावसायिक लठ्ठ ‘पॅकेज’ देण्यास अजिबात कचरत
नाहीत. त्यामुळेच या गटातील वेतनवाढीचे प्रमाण 11 ते 12 टक्के असे सर्वाधिक असल्याचे आढळते.

कोणत्या क्षेत्रात किती ?

10% हून अधिक : ई-कॉमर्स, टेक स्टार्ट-अप्स, आरोग्यसेवा, माहिती तंत्रज्ञान आणि संबंधित क्षेत्रे.
10% हून कमी : शेती व अ‍ॅग्रोकेमिकल्स, वाहन व पूरक, बँकिंग, वित्तीय सेवा व विमा, बीपीओ व आयटी एनेबल्ड सेवा, बांधकाम व रिअल इस्टेट, शिक्षणसंबंधित सेवा, एफएमसीजी, आतिथ्य, औद्योगिक उत्पादन, प्रसारमाध्यमे व मनोरंजन, ऊर्जा, किरकोळ विक्री, दूरसंचार.

Back to top button