बाजारांच्या पडझडीतही गौतम अदानी मालामाल | पुढारी

बाजारांच्या पडझडीतही गौतम अदानी मालामाल

मुंबई ; पुढारी डेस्क : आधी कोरोना महामारी आणि नंतर रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील बाजारांमध्ये प्रचंड चढ-उतार दिसून आले. त्यातही सर्वच शेअर बाजारांत मोठी घसरण झाली. मात्र, या व्यापक आर्थिक पडझडीतही जगातील ‘टॉप टेन’ अब्जाधीशांमध्ये गणल्या जाणार्‍या दोघांच्या संपत्तीत हजारो कोटींची भरच पडली. त्यापैकी एक नाव आहे वॉरेन बफेट आणि दुसरे नाव आहे भारतातील बहुचर्चित उद्योगपती गौतम अदानी. विशेष म्हणजे, अदानी यांचा पैसे कमावण्याचा झपाटा सर्वांपेक्षा जास्त आहे.

गेल्या दोन वर्षांपासून जगभरातील शेअर बाजारांत प्रामुख्याने अस्थिरतेचे वातावरण आहे. या वर्षातच भारतातील मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हे दोन्ही निर्देशांक जवळपास 10 टक्क्यांनी घसरले. या वातावरणात देशासह जगभरातील धनिकांच्या तिजोरीला मोठी गळती लागल्याचे दिसले. या तडाख्यातून ‘टॉप टेन’मधील अग्रणी एलॉन मस्क यांच्यासह अन्य ‘नवकोट नारायण’ही सुटले नाहीत. अपवाद फक्त दोघेच : वॉरेन बफेट आणि गौतम अदानी. विशेषत: अदानी यांच्या संपत्तीत सर्वाधिक वेगाने प्रचंड वाढ झाली आहे.

ब्लूमबर्ग बिलिनेयर्स इंडेक्समध्ये वारेन बफेट 11.2 हजार कोटी डॉलर्स म्हणजे 8.67 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह पाचव्या क्रमांकावर आहेत. बर्कशायर हॅथवे कंपनीचे चेअरमन आणि सर्वांत मोठे भागधारक असलेल्या बफेट यांच्या संपत्तीत या वर्षात 262 कोटी डॉलर्स म्हणजे 20.26 हजार कोटी रुपयांची भर पडली. कोका-कोला आणि अमेरिकन एक्स्प्रेस या अवाढव्य उद्योगांतही त्यांची भागीदारी आहे.

जगातील सातव्या आणि आशियातील पहिल्या क्रमांकाचे धनवंत असणारे गौतम अदानी यांच्या संपत्तीचे मूल्य आहे 10.2 हजार कोटी डॉलर्स म्हणजे 7.89 लाख कोटी रुपये. मुकेश अंबानींनाही मागे टाकणार्‍या अदानींच्या संपत्तीसंचयाची गती स्तिमित करणारीच आहे. यंदा बाजारांमधील चढ-उतारांची कसलीही झळ न लागता अदानींची संपत्ती बफेट यांच्या तुलनेत 9 पटींपेक्षाही अधिक, 2550 कोटी डॉलर्स म्हणजे 1.97 लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. त्यांची धनमागार्र्वरील घोडदौड याच वेगाने सुरू राहिल्यास दुसरे स्थान गाठणेही फारसे कठीण दिसत नाही.

मस्कना मोठा फटका

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांची संपत्ती या वर्षात 5560 कोटी डॉलर्सने (4.3 लाख कोटी रुपये) कमी झाली. त्यामुळे त्यांची ‘नेटवर्थ’ 21.5 हजार कोटी डॉलर्सपर्यंत (16.63 लाख कोटी रुपये) घसरली आहे. अदानींपूर्वी आशियातील पहिल्या क्रमांकाचे धनिक असलेले रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची संपत्ती या वर्षात 2.32 हजार कोटी डॉलर्सने (17.94 हजार कोटी रुपये) कमी झाली. एकूण 8770 कोटी डॉलर्स (6.78 लाख कोटी रुपये) संपत्तीसह ते 11 व्या क्रमांकावर आहेत.

Back to top button