मुंबईसाठी ‘एकच कारभारी’ वर्षभरात; आदित्य ठाकरे यांचे संकेत | पुढारी

मुंबईसाठी ‘एकच कारभारी’ वर्षभरात; आदित्य ठाकरे यांचे संकेत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईचा कारभार चालवण्यासाठी महापौरांच्या नेतृत्वाखाली एकच नियोजन प्राधिकरण वर्षभरात अस्तित्वात येईल, असे मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे संकेत.

क्लायमेट क्रायसिस 2.0 या आंतरराष्ट्रीय परिषदेत समुद्र किनारपट्टीवरील शहरांसाठी वित्तीय पुरवठा करण्याच्या विषयावर आदित्य बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले, सध्या मुंबईत अनेक सरकारी यंत्रणा आहेत. मुंबईचा कारभार हाकणार्‍या अशा 16 प्रशासकीय यंत्रणा आणि 43 सेवा यंत्रणा आहेत. मुंबईत साधा फूटपाथ बांधायचा तरी ते एक मोठे आव्हान होऊन बसले आहे. त्यामुळेच प्रकल्पांच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी एकच नियोजन प्राधिकरण आवश्यक आहे. अर्थात त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सीईओ नेमण्याची गरज नाही, तर जादा अधिकार असलेला महापौर या एकल नियोजन प्राधिकरणाचे नेतृत्व करेल. आम्ही अशा एकल नियोजन प्राधिकरणावर सध्या काम करत असून, वर्षभरात ही यंत्रणा अस्तित्वात येईल. या यंत्रणेचे नेतृत्व महापौरांकडे देण्याचे कारण म्हणजे महापौर हा अधिक लोकशाहीवादी असू शकेल.

मुंबईसाठी एकल नियोजन प्राधिकरणाची घोषणा करून आदित्य ठाकरे यांनी एका प्रदीर्घ आणि वादाच्या विषयालाच हात घातला. 2018 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महापालिकांना जादा अधिकार देतानाच महापौर परिषदेची कल्पना मांडली होती. अगदी अलीकडे मुंबई महापालिकेचे महत्त्वाकांक्षी आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी मुंबईचा सर्व कारभार चालवण्यासाठी सीईओ नियुक्त करावा आणि तो मुंबई महापालिकेचा आयुक्तच असावा, अशी कल्पना मांडली होती.

Back to top button