महामंडळांच्या यादीवरून काँग्रेसमध्ये वाद! | पुढारी

महामंडळांच्या यादीवरून काँग्रेसमध्ये वाद!

मुंबई ; नरेश कदम : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या महामंडळांवर पक्ष पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्याच्या यादीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यात वाद झाला आहे. थोरात यांनी परस्पर महामंडळांवर नियुक्त करण्याच्या पदाधिकार्‍यांची यादी मागवून घेतल्यामुळे पटोले यांनी थोरात यांची तक्रार प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे केली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या आमदारांना दुय्यम वागणूक दिली जाते. विकास निधी देतानाही अन्याय केला जातो, अशी तक्रार काँग्रेसच्या आमदारांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली होती. त्यानंतर काँग्रेस आमदारांच्या तक्रारीबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना चर्चेसाठी बोलविणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात पटोले यांना मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ दिली नाही.

त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे पटोले हे नाराज आहेत. त्यातच महामंडळांवर नियुक्त करण्याच्या पदाधिकार्‍यांची यादी थोरात यांनी मागवून त्यात काही बदल केल्यामुळे पटोले यांनी थोरात यांची प्रदेश काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे.

काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या महामंडळांवर नियुक्त्या करण्यासाठी अंतिम यादी मुख्यमंत्री कार्यालयाने मागितली आहे. परंतु काँग्रेसच्या या यादीत आपल्या समर्थकांची वर्णी लावण्याची शिफारस काँग्रेसचे मंत्री आणि आमदारांनी केली आहे. महामंडळावरच्या 30 टक्के नियुक्त्या या काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या होणार आहे. महामंडळावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षाला प्रत्येकी 30 टक्के वाटा मिळणार आहे. तर महाविकास आघाडी च्या अन्य मित्र पक्षांना 10 तर 10 टक्के जागा देण्यात येणार आहेत.

त्यामुळे या ,30 टक्के जागांसाठी काँग्रेसमध्ये जोरदार स्पर्धा आहे. त्यामुळे अंतिम यादी बनण्यास अडचण येत आहे. त्याचच थोरात यांनी ही यादी मागवून त्यात काही बदल केल्यामुळे पटोले वैतागले आहेत. त्यांनी प्रभारी एच. के. पाटील यांच्या कानावर ही गोष्ट घातली आहे.

दरम्यान, पटोले थोरात यांच्यातील वाद हा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दरबारात पोचला आहे. प्रभारी एच. के. पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. आणि राज्यातील काँग्रेस नेत्यांची वादाबाबत चर्चा केली. तसेच काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या महामंडळावर नियुक्त्या करण्याबाबतही यावेळी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

* काँग्रेसचे आमदार हे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल नाराज आहेत. त्यांच्या मतदारसंघातील कामे होत नाहीत. काँग्रेसचे मंत्री आमदारांच्या कामांना प्राधान्य देत नाहीत, याबाबत पाटील यांनी सोनिया गांधी यांना सांगितले. महाविकास आघाडी सरकारने दलित, आदिवासी, कष्टकरी शेतकरी यांच्या योजना राबवाव्यात, असे पत्र सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षभरापूर्वी पाठवले होते. त्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी पाठवले नाही, अशी तक्रार पटोले यांनी प्रभारी पाटील यांच्याकडे केली होती. त्याबाबत काँग्रेसच्या मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाब विचारावा, असे प्रभारी पाटील यांनी काँग्रेस मंत्र्यांना सांगितले आहे.

Back to top button