शरद पवार : हनुमान चालिसा म्हटल्याने महागाईचा प्रश्‍न सुटेल का? | पुढारी

शरद पवार : हनुमान चालिसा म्हटल्याने महागाईचा प्रश्‍न सुटेल का?

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा
मशिदीसमोर हनुमान चालिसा लावल्याने जनतेचे प्रश्‍न सुटणार आहेत का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केला. मूळ प्रश्‍नांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी अशा प्रकारचे मुद्दे पुढे आणले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

समाजातील अशा घटकांना उत्तर द्यायचे असेल तर शाहू-फुले-आंबेडकर यांचा विचार स्वीकारणे हा एकमेव मार्ग उरतो, असे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विमुक्‍त जाती, भटक्या जमाती व मागासवर्गीय सेलतर्फे आयोजित कृतज्ञता मेळाव्यात बोलताना सांगितले. जाती-धर्माच्या नावाने राज्यात आणि पर्यायाने देशात फूट पाडण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे. महागाई, बेरोजगारी हे सध्या समाजाला भेडसावणारे प्रश्‍न आहेत. मात्र, या प्रश्‍नांना बगल देऊन दुसरेच मुद्दे पुढे केले जात आहेत. मी शाहू-फुले-आंबेडकर यांचे नाव घेतो म्हणून एक नेता सध्या माझ्यावर टीका करीत फिरत आहे. मात्र, त्यांच्या विचारामुळेच देश एकसंध राहिला आहे. नाही तर शेजारच्या श्रीलंका आणि पाकिस्तानची अवस्था पाहा म्हणजे कळेल. घटनाकारडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान आणि शाहू-फुले यांचे विचार यामुळेच भारताचा संपूर्ण जगात दबदबा निर्माण झाला आहे.

Back to top button