मुंबई : आता समुद्र किनार्‍यालगत शौचालय | पुढारी

मुंबई : आता समुद्र किनार्‍यालगत शौचालय

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई शहर व उपनगरातील चौपाट्यांवर फेरफटका मारण्यासाठी येणार्‍या पर्यटकांसाठी पालिकेने सात आसनी शौचालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यात सर्वाधिक शौचालय जुहू व दादर माहीम चौपाटीवर उभारण्यात येणार आहेत. या शौचालयांमध्ये पुरुष-महिलांसह शारीरिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांसाठीही स्वतंत्र व्यवस्था असणार आहे.

केंद्राच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत गिरगाव, दादर, माहीम, जुहू, वेसावे, मढ, मार्वे, मनोरी व गोराई आदी चौपाट्यांवर येणार्‍या पर्यटकांसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या चौपाटी जवळ असलेली शौचालय अपुरी पडत असल्यामुळे 27 नवीन शौचालये उभारण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय हरित न्यायासनाने हागणदारी होण्याची शक्यता असलेल्या समुद्रकिनार्‍याजवळील ठिकाणी शौचालये उभारण्याच्या सूचना महापालिकेला केल्या होत्या.

नव्याने उभारण्यात येणार्‍या शौचालयांमध्ये सात शौचकूपे असणार आहेत. यात पुरुषांसाठी तीन महिलांसाठी तीन व शारीरिकदृष्ट्या दुर्बलांसाठी एक शौचकूप असणार आहे. या शौचालयांसाठी 3 कोटी 33 लाख तीस हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ही शौचालये उभारण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली असून येत्या चार महिन्यात ही शौचालय उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यटकांना आता शौचालय शोधण्याची गरज भासणार नाही. तर दुसरीकडे समुद्रकिनारे स्वच्छ राहतील, असा दावा मुंबई महापालिकेने केला आहे.

Back to top button