मुंबईतील 40 वर्षांखालील लोक ताणाखाली | पुढारी

मुंबईतील 40 वर्षांखालील लोक ताणाखाली

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : छत्तीस वर्षीय अरुण (नाव बदलले आहे), मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह असून, गेल्या शनिवारी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचा त्याची पत्नी शालूला संशय आला, पुढील तीन तासांत त्याची अँजिओप्लास्टी झाली. अरुणसारख्या अनेक तरुणांच्या बाबतीत अशीच परिस्थिती उद्भवत आहे. 40 वर्षांखालील लोकांची कॅथलॅबमध्ये संख्या वाढू लागल्यामुळे तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

जेवणाच्या अयोग्य वेळा, तणाव, बदललेली जीवनशैली यामुळे सध्या वयाच्या 40 वर्षांपूर्वीच हृदविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. 2020 मध्ये, आम्ही 40 वर्षांखालील 116 रुग्णांवर अँजिओप्लास्टी केली. 2021 मध्ये ही संख्या 168 झाली, असे ठाण्याच्या रुग्णालयातून सांगण्यात आले. तर जानेवारी ते 15 एप्रिलदरम्यान, रुग्णालयाच्या कार्डिओलॉजी टीमने 40 वर्षांखालील 67 लोकांवर अँजिओप्लास्टी केली आहे.

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गणेश कुमार यांनी एकत्रित केलेल्या 10 वर्षांच्या डेटानुसार, पवईच्या एका हॉस्पिटलमध्येही अशीच परिस्थिती आहे. यातील डेटानुसार त्यांच्या कॅथलॅबमध्ये 2009 ते 2019 दरम्यान प्राथमिक अँजिओप्लास्टी केलेल्या 40 वर्षांखालील लोकांच्या संख्येत 250% वाढ झाली आहे.

2019 मध्ये त्याच्या देखरेखीखाली असलेल्या 309 हृदयरुग्णांपैकी 170 जणांना मधुमेह होता. परंतु तरुणांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमागे जीवनशैली आणि तणाव हे एक मोठे कारण आहे, डॉ. गणेश कुमार सांगतात, नोकरीतील तणाव, नोकरी गमावण्याची भीती, मनोरंजनाची कमी पातळी आणि झोपेच्या आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी हे इतर कारणीभूत आहेत, असे हृदयरोगतज्ज्ञ सांगतात.

2020 च्या मुंबईतील मृत्यूच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, 1.1 लाख मृत्यूंपैकी सुमारे 25% मृत्यू हृदयाच्या समस्यांमुळे झाले आहेत. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या की, 2020 मध्ये आम्ही मृत्यूची संख्या नेहमीपेक्षा जास्त पाहिले त्यावेळी दिवसाला जवळपास 300 मृत्यू होत होते. मात्र हे कोविडशी संबंधित आहे की कोविडमुळे किंवा तणावामुळे याचा आम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करावा लागेल.

वेळीच रुग्णालयात नेल्याने वाचले प्राण

अरुणची पत्नी शालू म्हणाली की, तो दोन वर्षांपूर्वी कोविडमधून बरा झाला होता. लाँग वीकेंडमध्ये या जोडप्याने शनिवारी संध्याकाळी मोहम्मद अली रोडवर रमजानचे स्वादिष्ट पदार्थ चाखण्यासाठी जाण्याचा बेत आखला होता. अरुणने शुक्रवारी विश्रांती घेतली आणि शनिवारी सकाळी उत्साहाने उठला, परंतु दुपारी 3.30 च्या सुमारास त्याने बरे वाटत नसल्याचे सांगत पुन्हा आराम करू लागला. आरामानंतर उठून बसल्यावर त्याला चक्कर आली आणि तो कोसळला. मी त्याला लिंबू पाणी दिले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.शेजार्‍यांच्या मदतीने,त्याला जवळच्या दवाखान्यात नेले. गुंतागुंत जास्त असल्याने तेथून त्याला मोठ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. तिथून त्याला ज्युपिटरमध्ये आणले.

त्याला कॅथ लॅबमध्ये नेले तेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका आला, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विजय सुरासे म्हणाले. कारण अरुणच्या उजव्या रक्तवाहिन्यांमध्ये 100% ब्लॉकेज असल्याची पुष्टी झाली. तर डाव्या बाजूच्याही दोन रक्तवाहिन्यांमध्येही 100% ब्लॉकेजे होते. त्यावेळी आम्ही त्याच्या छातीवर झपकारे(सीपीआर) मारले. अर्धा तास ही प्रक्रिया सुरू केली. त्यांना बरे वाटले त्यानंतर एन्जिओप्लास्टी करून गुरुवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला,असे डॉ.सुरासे यांनी सांगितले.

Back to top button