राज्यपालनियुक्त आमदारांच्या यादीतून राजकीय नावे वगळणार | पुढारी

राज्यपालनियुक्त आमदारांच्या यादीतून राजकीय नावे वगळणार

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेच्या राज्यपाल नामनियुक्त सदस्यांसाठी महाविकास आघाडीने पाठविलेली 12 सदस्यांची यादी राज्यपालांनी रोखल्याने त्यातील राजकीय नावे वगळून नवी यादी महाविकास आघाडी तयार करणार असल्याचे समजते. त्याचा फटका माजी मंत्री एकनाथ खडसे, सचिन सावंत, विजय करंजकर यांना बसणार आहे.

महाविकास आघाडीतून बाहेर पडलेले माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीकडून आपण आमदारकी स्वीकारणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. महाविकास आघाडीने 12 सदस्यांची नावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवून दीड वर्ष झाले तरी या यादीला त्यांनी मंजुरी दिली नाही. या यादीत राजकीय नेत्यांची नावे असल्याने राज्यपालांनी या यादीला मंजुरी दिली नाही. या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले तरीही राज्यपाल आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांच्या भेटीत या नियुक्तीचा विषय छेडला होता. त्यानंतर राजकीय नावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. नवीन यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुढच्या आठवड्यात राज्यपालांकडे पाठविण्याची शक्यता आहे. त्यामुळे या यादीतील राजकीय नेत्यांना धक्का बसणार आहे. त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याबाबतही उत्सुकता आहे.

राज्यपालांचे ‘ते’ पत्र बनावट

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना आमदारांच्या नावांची शिफारस केल्याचे पत्र दोन वर्षांपूर्वी व्हायरल झाले होते. हे पत्रही पुन्हा चर्चेत आले आहे. मात्र हे पत्र बनावट असल्याचे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना सहा नावांची शिफारस केल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले होते. दरम्यान, या पत्राची चौकशी करून गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Back to top button