गणेश नाईक यांच्या शोधात पथके | पुढारी

गणेश नाईक यांच्या शोधात पथके

बेलापूर ; पुढारी वार्ताहर : बलात्काराचा गुन्हा दाखल झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या शोधासाठी नवी मुंबई पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. गणेश नाईक यांचे मुरबाड येथील फॉर्महाऊस तसेच कोपरखैरणेसह अन्य ठिकाणी त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, बलात्कारासह जिवे मारण्याची धमकी दिल्याचे गंभीर गुन्हे दाखल होऊन 48 तास उलटले तरी गणेश नाईक यांना अटक न करण्यात आल्याने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकार्‍यांनी नवी मुंबई पोलीस परिमंडळ 1 कार्यालयावर धडक देत तत्काळ अटक करण्याची मागणी केली.

गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी त्यांना तत्काळ अटक करावी, असे निर्देश पोलिसांना दिले होते. मात्र दोन दिवस उलटूनही अटक न झाल्याने राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी नवी मुंबई पोलीस परिमंडळ कार्यालयावर धडकले.

गणेश नाईक यांना अटक का करण्यात येत नाही, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. या आंदोलनात प्रदेश सचिव भावना घाणेकर, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ.प्राजक्ता मोडकर,कार्यध्यक्ष सुनीता देशमुख, राजश्री येवले यांसह मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. यावेळी पोलिसांनी निवेदन स्वीकारत आमचे पूर्ण प्रयत्न सुरू असून लवकरच नाईक यांना अटक करण्यात येईल अशी माहिती दिली.

Back to top button