अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या मुलीचा आगळावेगळा छंद | पुढारी

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या मुलीचा आगळावेगळा छंद

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गावदेवी पोलिसांनी अटकेची कारवाई केल्यानंतर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पोलिसांच्या तपासात अ‍ॅड. सदावर्ते यांच्याबाबत नवनवीन माहिती समोर येत असतानाच अ‍ॅड. सदावर्ते यांच्या मुलीचा एक आगळावेगळा छंद चर्चेत आला आहे.

अ‍ॅड. सदावर्ते यांची एक मुलगी झेन हिला अन्य मुलांप्रमाणेच पाळीव प्राण्यांबद्दलदेखील आकर्षण आहे. झेन आपल्या मूळगावी नांदेड येथील मालेगाव येथे जाते. तेव्हा तिला प्राण्यांसोबत खेळायला आवडते. तिचा हा छंद तिची आई अ‍ॅड. जयश्री पाटील आणि वडील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. झेनने एक गाढव पाळले आहे. त्याचे नाव मॅक्स आहे. फ्लॅटमध्ये सहसा गाढव पाळताना कोणी दिसत नाही. पण झेनने गाढव पाळले आहे.

झेनला फक्त गाढवच आवडतो, असे नाही. तर, झेनच्या एका फोटोत तिने वासरालाही मिठी मारल्याचे दिसून येते. झेन एका फोटोत गाईला लळा लावताना दिसून आली आहे. अर्थातच झेनसाठी हे सर्वच प्राणी समान आहेत; पण गाढव पाळण्याची हिंमत दाखवणे ही मोठी गोष्ट आहे. यासाठी झेन ही खरोखरच कौतुकास पात्र आहे, अशा पोस्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहेत. दरम्यान, झेनने यापूर्वी मुंबईत आगीत अडकलेल्या लोकांनी काय काळजी घ्यावी आणि कसे बाहेर यावे याच्या टीप्स दिल्या होत्या. याबद्दल तिला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

Back to top button