राष्ट्रवादीशी युती करण्याचे शिवसेनेचे संकेत | पुढारी

राष्ट्रवादीशी युती करण्याचे शिवसेनेचे संकेत

मुंबई ; नरेश कदम : राज्यात भाजप आणि मनसेच्या युतीची समीकरणे जुळत असताना, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत. या युतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यातील राजकीय समीकरणे आता कूस बदलू लागली असून, मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे भाजपच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर वाटचाल करू लागले आहेत. भाजपला खटकणारी उत्तरभारतीयांच्या विरोधातील भूमिकेची कात राज ठाकरे यांनी टाकून दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजप आणि मनसेच्या युतीचेही संकेत मिळत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. त्यातूनच नवे मित्र जोडण्याच्या दिशेने शिवसेनेची पावले पडू लागल्याचे दिसतात.

भाजप-मनसे युती झाली तर त्यांना मुंबईसह ठाणे या महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर टक्कर देणे शिवसेनेसाठी कठीण आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने चर्चा सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात युतीबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मुंबईत राष्ट्रवादीची ताकद फारशी नसली तरी ठाणे, नाशिक आणि पुणे या महापालिकेत शिवसेनेला राष्ट्रवादीचा फायदा होईल. त्यामुळे मुंबईत काँग्रेससोबत युती करण्याचा प्रस्ताव शिवसेनेने काँग्रेसला दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वरिष्ठस्तरावर युती केली, पण स्थानिक पातळीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची मने जुळतील काय, याबद्दल नेत्यांना साशंकता असल्याने सेनेला अद्याप राष्ट्रवादीकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

शिवसेनेसोबत युती करण्याबाबत मुंबई काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या गटाचा शिवसेनेशी युती करण्यास विरोध आहे. तसेच राज्यातील इतर महापालिकांबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका अजून स्पष्ट नाही. काँग्रेस जिल्हाध्यक्षांकडून अहवाल आल्यानंतर पक्षाध्यक्ष निर्णय घेणार असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले.

Back to top button