समुद्री उष्ण लहरी वाढल्या; मान्सूनवर प्रतिकूल परिणाम | पुढारी

समुद्री उष्ण लहरी वाढल्या; मान्सूनवर प्रतिकूल परिणाम

कोल्हापूर ; मोहसीन मुल्ला : हिंद महासागर आणि बंगालच्या उपसागरात समुद्री उष्ण लहरी यामध्ये वाढ होत असून त्याचा प्रतिकूल परिणाम मान्सूनवर होत असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटिरॉलॉजी या संस्थेतील संशोधक रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी हे संशोधन केलेले आहे.

या समुद्री उष्ण लहरी, त्या जोडीने समुद्राचे वाढते तापमान, एल निनो यामुळे मध्य भारतात अवर्षणाची स्थिती वाढणे तर भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात पावसाचे प्रमाण वाढत आहे, असे हे संशोधन सांगते. कोल यांनी दै. ‘पुढारी’ला यासंदर्भात माहिती दिली. समुद्री उष्ण लहरी याचा अर्थ समुद्रातील तापमान जास्त प्रमाणात वाढणे. 90 पर्सेंटाईलच्यावर तापमान वाढले तर त्याला समुद्री उष्णतेची लहर किंवा लाट असे म्हटले जाते. याचा प्रतिकूल परिणाम समुद्रातील जैवविविधतेवर होतो. अशा मे 2020मधील समुद्री लाटांमुळे तामिळनाडू येथील गल्फ ऑफ मनारमधील 85 टक्के प्रवाळांचे ब्लिचिंग झालेले आहे, असे कोल यांनी सांगितले.

हिंद महासागरात अशा उष्ण लहरी या दुर्मीळ मानल्या जात होत्या.पण आता या लहरी दरवर्षीच येत आहेत. 1982 ते 2018 या कालावधीत पश्चिम हिंद महासागरात एकूण 66 उष्णतेच्या लहरी नोंदवण्यात आल्या. ही वाढ दशकात 1.5 इतकी आहे, तर बंगालच्या उपसागरात अशा 94 घटना नोंदवल्या आहेत. ही वाढ दशकात 0.5 टक्के इतकी आहे. मान्सूनवरील परिणाम पश्चिम हिंद महासागर आणि बंगालच्या उपसागरातील उष्ण लहरींमुळे मध्य भारतात अवर्षणाची स्थिती वाढलेली आहे; तर भारतातील द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात पावसाचे प्रमाण वाढलेले आहे. या उष्ण लहरींचा मान्सूनच्या वार्‍यांवर परिणाम होत असल्याने हे बदल घडत आहेत, असे या संशोधकांनी म्हटलेले आहे.

कोल म्हणाले, हवामान बदलाचे प्रारूपनी वर्तवलेल्या अंदाजानुसार हिंद महासागराचे तापमान वाढत जाईल. त्यामुळे समुद्री उष्ण लहरीही वाढत जातील. त्याचा परिणाम मान्सूनवरही होणार आहे. समुद्री उष्ण लाटांची वारंवारता, तीव्रता आणि विस्तार येत्या काळात वाढत जाईल. त्यामुळे अशा घटनांमुळे समुद्राच्या वातावरणात काय बदल होतात, यावर आपल्याला अधिक लक्ष ठेवावे लागेल आणि त्यानुसार हवामानाचे आपले मॉडेलही बदलावे लागेल.

जेणेकरून आपल्याला या बदलांचा योग्य अंदाज वर्तवता येईल, असे ते म्हणाले. या संशोधनात कोल यांच्या समवेत केरळ कृषी विद्यापीठाचे संशोधक जे. एस. सरन्या, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटिरॉलॉजीचे पानिनी दासगुप्ता, कोचिन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे अजय आनंद यांचा सहभाग आहे.

अरबी समुद्र आणि उष्णतेच्या लाटा?

समुद्रातील उष्णतेच्या लहरी अरबी समुद्रातही दिसतात. परंतु या लहरी विखुरलेल्या आणि कमी विस्ताराच्या आहेत. पण अरबी समुद्राचे वाढते तापमान लक्षात घेता अरबी समुद्रातील उष्णतेच्या लहरींचे प्रमाण आणि विस्तार वाढेल, असे संशोधकांचे मत आहे.

वाढत्या चक्रीवादळांशी संबंध आहे का?

समुद्रातील उबदार तापमानामुळे निर्माण होणारी उष्णता आणि आर्द्रता ही तीव्र स्वरूपाच्या चक्रीवादळांना पूरक ठरतात. अरबी समुद्राचे वाढते तापमान, आर्द्रता जास्त काळ राहणार्‍या चक्रीवादळांना पोषक ठरत आहे. अम्फान या चक्रीवादळाची तीव्रता फार वेगाने वाढली होती. या चक्रीवादळानंतर उष्णतेची लहर आली होती. पण समुद्री उष्णतेच्या लाटा आणि चक्रीवादळ यांचा परस्पर काही संबंध आहे का, यावर सविस्तर अभ्यास करावा लागेल, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रावर काय प्रभाव पडेल?

या संस्थेने केलेल्या दुसर्‍या एका अभ्यासात अरबी समुद्राचे तापमान वाढत असून त्यामुळे सह्याद्रीतील महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या भागांत अतिपावसाच्या घटनांत तिप्पट वाढ झाल्याची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये झालेल्या अतिपावसामुळे वाशिष्टी नदीला महापूर आला होता. पण याचा संबंध अरबी समुद्रातील उष्णतेच्या लहरींशी आहे का, यावर अधिक संशोधन करावे लागेल, असे कोल म्हणाले.

Back to top button