मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग लवकरच होणार सुसाट? | पुढारी

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग लवकरच होणार सुसाट?

मुंबई ; चेतन ननावरे : महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईला उपराजधानी नागपूरशी जोडणार्‍या समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा 2 मेपासून खुला होणार असून, वाहनांसाठी कमाल वेगमर्यादा ताशी 120 किमी ठेवावी, अशी मागणी एमएसआरडीसीने महामार्ग पोलिसांकडे केली आहे. त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची माहिती सूत्रांनी दिली.

केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देशातील महामार्गांसाठी कमाल वेगमर्यादा ताशी 120 किमी निश्चित केलेली आहे. मात्र सध्या महाराष्ट्रात कमाल वेगमर्यादा मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर ताशी 100 किमी आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गावर तासी 100 किमी वेगमर्यादा नाही. समृद्धी महामार्गावर धोकादायक वळणे टाळताना एमएसआरडीसीने तो अधिकाधिक सरळ कसा राहील, याची खबरदारी घेतली आहे. त्यामुळे इतर राज्यांतील महामार्गांप्रमाणे समृद्धी महामार्गावरही ताशी 120 किमी कमाल वेगमर्यादा ठेवावी, अशी मागणी एमएसआरडीसीने केली आहे.

वेगमर्यादेत ही वाढ झाल्यास मुंबई-नागपूर अंतर जलदगतीने कापणे शक्य होईल. सध्याच्या वेगमर्यादेमुळे हा हेतू साध्य होणार नाही, असे एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी गेलेले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ताशी 148 किमी वेगाने इलेक्ट्रिक वाहन चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला होता. त्यावरून कमाल वेगमर्यादा ताशी 120 किमी ठेवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महामार्ग पोलिसांच्या निर्णयाकडे लक्ष

महामार्ग पोलिसांचे अपर महासंचालक कुलवंत कुमार सारंगल यांनी सांगितले की, अद्याप हा महामार्ग सामान्यांसाठी खुला झालेला नाही. एमएसआरडीसीच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. सर्वंकष विचारानंतर आणि अभ्यासानंतर वेगमर्यादा वाढवण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात 2017 पासून 2021 पर्यंत रस्ते अपघातांची संख्या 36 हजारांहून 29 हजारांपर्यंत घटली असली, तरी मृत्यूच्या संख्येत मात्र 12 हजारांवरून 13 हजारांपर्यंत वाढ झाली आहे. सर्वाधिक अपघाती मृत्यू सरळ रस्त्यांवर झाले आहेत. या मुद्द्याचा विचार महामार्ग पोलिसांना करावा लागेल.

Back to top button