जेम्स लेन म्हणतो, “मी बाबासाहेब पुरंदरेंकडून माहिती घेतली नाही” | पुढारी

जेम्स लेन म्हणतो, "मी बाबासाहेब पुरंदरेंकडून माहिती घेतली नाही"

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याच्या राजकारणात जेम्स लेनच्या पुस्तकांवरून पुन्हा एकदा जो काही वाद सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंडिया टुडेने जेम्स लेनला विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना लेन म्हणतो की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून कोणतीही माहिती घेतली नव्हती.” स्पष्टीकरणानंतर मराठा सेवा संघाचे प्रमुख पुरषोत्तम खेडेकर आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिलेली आहे.

जेम्स लेन म्हणतो की, “पुस्तकासाठी कुणीही माहिती पुरवली नाही. शिवरायांवरील पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे माहितीचा स्त्रोत नव्हते. त्याचबरोबर बाबासाहेब पुरंदरेंसोबत कोणतीही चर्चा केलेली नव्हती. मी जे पुस्तक लिहिले आहे, त्यामध्ये असा कोणताही उल्लेख नाही, वाचणाऱ्याच्या ते लक्षात येतं. ज्यांनी टीका केली आहे, त्यांना या पुस्तकातील कथानक समजलेलं नाही”, अशी प्रतिक्रिया जेम्स लेन यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलेलं आहे.

इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीच्या संदर्भाने एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिलं आहे. गुडी पाढवा मेळाव्यात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा जेम्स लेन आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्यासंदर्भातील वादग्रस्त मुद्दा उपस्थित केला. बाबासाहेब पुरंदरेंवर ज्यांनी टीका त्यांच्यावर राज ठाकरेंनी निशाणा साधला. परंतु, यावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार म्हणाले की, “पहिले ते जेम्स लेन याने गलिच्छ लिहिले होते, त्याचे कौतुक पुरंदरे यांनी केलं होतं हे म्हणणं सुद्धा गलिच्छ होतं. शिवजंयतीबाबत तर त्यांनी माफी सुद्धा मागितली. मग यावर जास्त बोलून काय उपयोग नाही”, अशी प्रतिक्रिया पवारांनी केली होती.

यानंतर मनसेने आता यासंदर्भात बाबासाहेब पुरंदरे यांचं एक पत्र समोर आणत शरद पवारांची टीका खोडण्याचा प्रयत्न केला. जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी आणणारं पत्र पुरंदरेंनी ऑक्सफर्ड प्रकाशनला लिहिलं होतं. ते पत्र समोर आणत मनसेनं शरद पवारांना प्रश्न विचारले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीतील प्रश्नांचं उत्तर देताना जेम्स लेननं जे उत्तर आहे. त्यावर राजकीय वर्तुळात कोणत्या प्रतिक्रिया उमटताहेत, हे पाहणं महत्वाचं आहे.

हे वाचलंत का? 

Back to top button