एसटी कर्मचार्‍यांची आझाद मैदानातून हकालपट्टी | पुढारी

एसटी कर्मचार्‍यांची आझाद मैदानातून हकालपट्टी

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर झालेल्या हल्ल्याचा पहिला परिणाम शनिवारी दिसला. तो म्हणजे, सहा महिन्यांपासून तळ ठोकून बसलेल्या संपकरी एसटी कर्मचार्‍यांना शनिवारी पहाटे आझाद मैदानातून बाहेर काढण्यात आले. तेथून हे कर्मचारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर ठिय्या देण्याच्या प्रयत्नात असतानाच तेथूनही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवत ट्रॉम्बे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पहाटे साडेचार वाजल्यापासून सुमारे 50 संपकरी कर्मचार्‍यांनी सीएसएमटी स्थानकात आसरा घेतला. मात्र रेल्वे पोलीस आणि तिकीट तपासनीसांनी त्यांच्याकडे तिकीट विचारले. तुमच्याकडे रेल्वे तिकीट नसेल तर प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडा, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले. परंतु कर्मचारी काही ऐकेनात.

तुम्ही कालपासून काही खाल्ले नाही, आम्ही तुम्हाला वडापाव देतो, तुम्ही स्थानकात बसून इतर प्रवाशांना त्रास होण्यापेक्षा रेल्वेच्या वेटिंगरूममध्ये बसा, तेथे तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही, तुम्हाला तुमच्या गावी नेऊन सोडतो, असे सांगून रेल्वे पोलिसांनी संपकर्‍यांना प्लॅटफॉर्म 18 कडे नेले.

तेथे आधीपासूनच शहर पोलिसांच्या गाड्या येऊन उभ्या होत्या. जसे संपकरी प्लॅटफॉर्म 18 कडील दादर दिशेच्या वेटिंगरूमशेजारी आले तसे पोलिसांनी या कर्मचार्‍यांना ताब्यात घेऊन पायधुनी, डोंगरी व डी.बी.मार्ग पोलीस ठाण्यात नेले. शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सीएमएमटी स्थानक मोकळे केल्याची माहिती सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेहबूब ईनामदार यांनी दिली.

मुंबई पोलिसांनी आझाद मैदानात एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनासाठी उभारण्यात आलेला भव्य मंडप व अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते यांचा फलकही काढून टाकला. शनिवारी दिवसभर आंदोलनस्थळी शांतता होती. मैदानातून बाहेर काढलेले आंदोलक काही रस्त्यावर थांबले, तर काहींनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या 1 व 2 या प्लॅटफॉर्मचा आसरा घेतला.

आता आझाद मैदानात सध्या शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांचे जुनी पेन्शन योजनेसंदर्भात व सफाई कामगारांचे प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. याही आंदोलनाला 100 दिवस होऊन गेले आहेत.

Back to top button