दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होणार : गृहमंत्री | पुढारी

दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होणार : गृहमंत्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना १४ दिवसांची न्यायालीयन कोठडी सुनाविण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनाही कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत सांगितले.

ते पुढे म्हणाले की, हिंसक आंदोलक करून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या निवासस्थानात घुसून आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्याविरोधात कारवाई होईल.. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होईल. त्याचबरोबर या आंदोलनाची पूर्वकल्पना न मिळाल्याने इंटेलिजन्स फेल्युअरचा मुद्दा समोर आला आहे. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनाही कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

दरम्यान, आता आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला सहकार्य करावे. त्यांनी आता शांतता राखावी, असे आवाहन वळसे पाटील यांनी केले. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांनी माझ्या जीवाला धोका आहे. माझी हत्या होऊ शकते.त्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील जबाबदार असतील, हा त्यांचा आरोप फेटाळून लावला. या प्रकरणी कायदेशीर मार्गाने निर्णय होईल. सदावर्ते यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही. त्यांना आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याची सवय आहे, असेही वळसे पाटील म्हणाले. कालच्या प्रकरणानंतर शरद पवार यांच्या कुटुंबियांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या आंदोलनाबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे, असेही वळसे -पाटील यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button