एसटी कर्मचार्‍यांच्या संपाने शेवटी काय साधले? | पुढारी

एसटी कर्मचार्‍यांच्या संपाने शेवटी काय साधले?

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : तब्बल पाच महिने संप करून पगाराला मुकलेल्या हजारो कर्जबाजारी संपकरी कामगारांना आता विलीनीकरणाशिवाय कामावर रुजू व्हावे लागणार, हे उच्च न्यायालयात गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर स्पष्ट झाले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर गुलालाची उधळण करत मूठभर कामगारांनी आझाद मैदानात जल्लोष केला असला, तरी ‘डंके की चोट पे विलीनीकरण मिळवणारच’, असा दावा करणार्‍या कामगारांची कामावर परतताना मोठी पंचाईत झाली आहे.

राज्यातील लाखो प्रवाशांना वेठीस धरून महामंडळाला कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक खाईत लोटल्यानंतर या संपातून नेमके काय मिळवले? या प्रश्नाचे उत्तर जल्लोष करणार्‍या कोणत्याच कामगाराकडे नव्हते.

उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर ग्रॅच्युईटी, पेन्शन आणि वेतन तफावत या शासनाने आधीच मान्य केलेल्या मागण्यांवर निर्णय सुनावण्यात आला. याशिवाय सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर एसटी कामगारांना वेतन देण्याच्या आधीच्याच घोषणेची पुनरावृत्ती झाली. मात्र अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतः दिलेल्या आश्वासनांवर एक चकार शब्दही काढला नाही. याउलट न्यायालयात हजर असूनही निकालाची प्रत हाती येत नाही, तोपर्यंत भूमिका जाहीर करणार नसल्याचे सांगत सर्व प्रश्नांना बगल दिली.

अ‍ॅड. सदावर्ते यांनी संपात उतरलेल्या कामगारांच्या आंदोलनास दुखवट्याचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्याआडून कामगारांना संप चालेल, तितक्या दिवसांचे वेतन व्याजासह मिळवून देण्याचे आश्वासित केले होते. महत्त्वाची बाब म्हणजे यापुढे महामंडळाचा कामगार म्हणून नव्हे, तर सरकारी कर्मचारी म्हणूनच कामावर परतण्याचा विश्वास मिळवून दिला होता. याच कारणास्तव निलंबनानंतर सेवा समाप्तीची कारवाई केल्यानंतरही कामगार कामावर परतले नाहीत.

सेवासमाप्ती झाल्यानंतरही न्यायालय आणि संविधानाच्या जोरावर पुन्हा सेवेत घेण्यास शासनास भाग पाडू, अशी मोठी आश्वासने अ‍ॅड. सदावर्तेंनी कामगारांना दिली होती. मात्र कामावर परतल्यानंतर विश्वासघातकी उपमा सहन केलेल्या कामगारांमधूनच आता संपकरी कामगारांवर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली आहे.

संपाचे हे परिणाम दीर्घकालीन

पाच महिन्यांच्या संपामुळे एसटीच्या संचित तोट्यात 15 हजार कोटींपर्यंत वाढ झाली आहे. ती भरून काढण्यास महामंडळास दशकाहून अधिक वेळ खर्ची घालावा लागेल.

एसटीमध्ये कायम सेवेतील

* चालक आणि वाहकांवर अवलंबून राहण्याचा प्रकार कमी होऊन या पदांसाठी भविष्यात कंत्राटीकरण केले जाईल.

* एसटीच्या चार हजार बसेस कालबाह्य झालेल्या असून त्यांची जागा भरून काढण्यासाठी अद्याप निविदा प्रक्रिया राबवलेली नाही.

* संपकरी आणि संपाविरोधात अशा प्रकारे एसटी महामंडळातील कामगारांत उभी फूट पडलेली आहे. त्यामुळे महामंडळात दोन टोकाचे गट निर्माण झाले आहेत.

* मालकी तत्त्वावरील बसेस चालवताना संपामुळे अडचण येत असल्याने एसटीचे खासगीकरण आता प्रत्यक्षपणे करण्यास सरकारने सुरुवात केली आहे.

* संपामुळे खासगी बस वाहतुकीकडे गेलेला प्रवासी पुन्हा लालपरीकडे वळवण्याचे आव्हान महामंडळासमोर असेल.

कार्यरत कामगारांकडून संपकर्‍यांवर ‘या’ प्रश्नांची सरबत्ती

* सरकारने सात वेळा संधी दिल्यानंतरही, फक्त विलीनीकरणासाठी कामावर न परतलेल्या कामगारांनी पाच महिने संप करून काय साध्य केले?

* संपामुळे वाहतूक नियंत्रक पदाच्या बढती परीक्षेपासून वंचित राहिलेल्या कामगारांचे काय?

* संपामुळे वार्षिक वेतनवाढीस मुकलेल्यांचे नुकसान कसे भरून काढणार?

* संप काळातील वेतन व्याजासह मिळवून देण्याचे काय झाले?

* पाच महिन्यांचा सेवाकाळ खंडित झाला, हे नुकसान कसे भरणार?

* पाच महिने कुटुंब चालवण्यासाठी कर्जबाजारी झालेल्या कामगारांचे कर्ज कोण फेडणार?

* संपामुळे कैक वर्षे मागे गेलेल्या एसटी महामंडळाचे नुकसान आता कसे भरणार?

Back to top button