स्कूल बस महागली, टॅक्सीही महागणार | पुढारी

स्कूल बस महागली, टॅक्सीही महागणार

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : एकीकडे 120 रुपयांच्या पुढे गेलेले पेट्रोल आणि दुसरीकडे सीएनजी दरात 7 रुपयांची वाढ झाल्यामुळे मुंबईत स्कूल बसचे भाडे 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय स्कूल बस मालक संघटनेने घेतला असून, टॅक्सीचे किमान भाडे 25 रुपयांवरून 30 रुपये करण्याची मागणी टॅक्सीमेन्स युनियनने केली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बुधवारी पुन्हा एकदा प्रतिलिटरला 80 पैशांनी वाढ झाली. गेल्या 16 दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर एकूण 10 रुपये वाढ झाली. मुंबई आणि ठाण्यात बुधवारी पेट्रोलच्या दरांनी आतापर्यंतचा 120 रुपयांचा उच्चांकी स्तर ओलांडला आहे. मुंबईमध्ये एक लिटर पेट्रोलचे दर 120.51 रुपये, तर एक लिटर डिझेलचे दर 104.77 रुपये झाले आहेत. ठाण्यातही एक लिटर पेट्रोलसाठी 120.65 रूपये, तर एक लिटर डिझेलसाठी 104.90 रुपये मोजावे लागत आहेत. या दरवाढीचे परिणाम आता मुंबईत दिसू लागले आहेत.

स्कूल बस मालक संघटनेचे प्रमुख अनिल गर्ग यांनी सांगितले की, बससाठी आवश्यक टायर, बॅटरी आणि इतर स्पेअर पार्टचे दर वाढले आहेत. त्यात राज्य व केंद्र शासनाने फिटनेस, विमा, पीयूसी अशा विविध परवानग्यांच्या शुल्कात दुपटीने वाढ केलेली आहे. मुंबईतील टोलही वाढला आहे. परिणामी, दरवाढीशिवाय दुसरा पर्याय स्कूल बस मालकांसमोर नाही.

टॅक्सी मेन्स युनियनचे प्रमुख ए.एल. क्वाड्रोस यांनी दैनिक पुढारीला सांगितले की, टॅक्सीचे किमान भाडे 30 रुपये करणे आवश्यक असल्याचे निवेदन परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिष सिंह यांना दिले आहे. रिक्षा चालक संघटनेचे प्रमुख शशांक राव यांनी मात्र भाडेवाढ टाळण्यासाठी राज्य सरकारने सीएनजीवरील व्हॅट पूर्णपणे माफ करण्याचा उपाय सुचवला. रिक्षाचे भाडे वाढवल्यास व्यवसाय कमी होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Back to top button