भारत-फ्रान्स बंदर व्यापाराला गती | पुढारी

भारत-फ्रान्स बंदर व्यापाराला गती

अलिबाग ; पुढारी वृत्तसेवा : जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीचा (जेएनपीए) हरित बंदर उपक्रम व शाश्वत विकास उपायांची फ्रान्सचे परिवहन राज्यमंत्री जॉन बातिस्ते जेब्बारी यांनी प्रशंसा केली आहे. जेब्बारी यांनी शनिवारी भारतातील या प्रमुख कंटेनर बंदरास भेट दिली; त्यावेळी ते बोलत होते.

जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी जेब्बारी व इतर फ्रेंच प्रतिनिधींचे स्वागत केले. जेएनपीए पायाभूत सुविधा व सागरी वाहतूक विकसित करताना शाश्वत उपायांवर भर देते. जेएनपीएने विविध मल्टी-मॉड्युल सुविधा आणि प्रकल्प विकसित केले आहेत, असे वाघ यांनी सांगितले. जेएनपी प्राधिकरणाने विविध प्रकल्पांबाबत सादरीकरण केले.

फ्रान्सच्या प्रतिनिधि मंडळाने जेएनपीए बंदर क्षेत्राचा दौरा केला व कामकाज आणि अद्ययावत सुविधांची माहिती घेतली. जेब्बारी यांच्या दौर्‍यामुळे भारत-फ्रान्स यांच्यातील जमीन, हवाई व सागरी वाहतूक क्षेत्रांतील संबंध अधिक मजबूत होतील, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला. यावेळी भारतीय बंदरे आणि लॉजिस्टिक व्हॅल्यू चेन विकसित करण्यासाठी फ्रेंच कंपन्यांच्या सहकार्यावर चर्चा झाली.

महामुंबई क्षेत्रातील आणि नवी मुंबई परिसरातील जेएनपीए हे भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी बंदर आहे. 26 मे 1989 रोजी स्थापना झालेले हे बंदर तीन दशकांतच देशातील बल्क-कार्गो टर्मिनलवरून प्रीमियर कंटेनर पोर्ट म्हणून नावारूपाला आले.

येथे जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल, न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल, गेटवे टर्मिनल्स इंडिया प्रा. लि., न्हावाशेवा इंटरनॅशनल गेटवे टर्मिनल आणि भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड अशी पाच कंटेनर टर्मिनल्स आहेत.

Back to top button