31 मार्चपर्यंत हजर व्हा; अन्यथा कारवाई | पुढारी

31 मार्चपर्यंत हजर व्हा; अन्यथा कारवाई

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : विलीनीकरणाच्या मुख्य मागणीसाठी गेल्या 152 दिवसांपेक्षा जास्त काळ संपावर असलेल्या सुमारे 50 हजार एसटी कर्मचार्‍यांना (ST employees) राज्य शासनाने 31 मार्चपर्यंतचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. संपकरी कर्मचारी या मुदतीत कामावर हजर झाले नाहीत, तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

एसटी महामंडळाचे कर्मचारी (ST employees) 27 ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर आहेत. आतापर्यंत फक्त 31 हजार कर्मचारी कामावर रुजू झाले असले, तरी त्यांच्यात चालक-वाहकांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला वाहतूक सुरू करण्यात अडचणी येत आहेत. सध्या फक्त 5 हजार एसटी बसेसमधून दिवसभरात 10 लाख प्रवाशांची वाहतूक होत आहे. परंतु ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत एसटी उपलब्ध होत नाही. विद्यार्थ्यांंना परीक्षा केंद्रांवर पोहोचवण्यासाठी पालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

उच्च न्यायालयाने मागील सुनावणीदरम्यान संपकर्‍यांना फटकारून कामावर रुजू होण्यास सांगितले होते. कामावर रुजू होणार्‍या संपकरी कर्मचार्‍यांवरील निलंबन, सेवासमाप्ती, बदली, बडतर्फी अशा कारवाया मागे घेण्याचे आश्‍वासनही परिवहन मंत्र्यांनी विधिमंडळात दिलेे.

राज्य सरकारने यापूर्वी संपकर्‍यांना 4 वेळा ‘अल्टिमेटम’ दिला होता; मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. आता सरकारने दिलेला हा शेवटचा इशारा असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर 5 एप्रिलला उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाने निर्देश न दिल्यास 50 हजार संपकर्‍यांवर राज्य सरकार कारवाईचा बडगा उगारू शकते.

महामंडळ काय म्हणते?

बडतर्फ कर्मचार्‍यांचे निवेदन मिळाल्यानंतर शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार प्रकरण निकाली काढावे. कारवाई न करता त्यांना त्याच वेतनश्रेणीवर रुजू करून घेतले जाईल.

निलंंबित व बडतर्फीची नोटीस दिलेले कर्मचारी 31 मार्चपर्यंत हजर झाल्यास निलंबनाची कारवाई आणि बडतर्फीची नोटीस मागे घेतली जाईल.

बदली झालेले संपकरी हजर झाल्यास त्यांना पूर्वीच्या ठिकाणी हजर करून घेण्यात येईल. सेवासमाप्ती केलेल्या कर्मचार्‍यांना 1 एप्रिलपासून पुनर्नियुक्ती देण्यात येईल.

Back to top button