संजय राऊत म्हणाले, सेनेसोबत केलेली चेष्टा महागात पडते! | पुढारी

संजय राऊत म्हणाले, सेनेसोबत केलेली चेष्टा महागात पडते!

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्र्यांबाबत तुम्ही जी भाषा वापरता, चेष्टा करता ती आम्ही सहन करायची का? शिवसेनेसोबत केलेली चेष्टा किती महागात पडते याचा अनुभव घेताय ना, असा टोला लगावत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना रविवारी प्रत्युत्तर दिले.

संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक जुगलबंदी सुरूच आहे. राऊत म्हणाले, चंद्रकांतदादांनी नुकतेच एक ऐतिहासिक विधान केलेे. या देशात, जगात दुसरे कोणीच काम करत नाहीत. ना बायडन, पुतीन, बोरिस, ना झेलेन्स्की…फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच 22 तास काम करतात. 24 तासांतील 22 तास काम आणि फक्त दोन तास त्यांना झोप मिळते, असे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे आहे.

मोदींना जी 2 तास झोप मिळते, तीही मिळू नये आणि 24 तास देशाची सेवा करावी, यासाठी प्रयोग सुरू आहेत, असे पाटील यांचे म्हणणे आहे. हे ऐकून खुद्द पंतप्रधान मोदींची उरली सुरली दोन तासांचीही झोप उडाली असेल. अशी चमचेगिरी कधीही बघितली नव्हती आणि असे चमचेही देशात बघितले नाहीत, अशी टीका राऊत यांनी पाटील यांच्यावर केली होती.

त्यावर पाटलांनी कोल्हापुरात राऊत यांना प्रत्युत्तर दिले. मी ‘सामना’ वाचणे आणि संजय राऊतांवर बोलणे बंद केले आहे. जे जात्यात आहेत त्यांचे पीठ झाले आहे आणि जे सुपात आहेत ते लवकरच जात्यात जातील, असे पाटील म्हणाले.

मेहबुबा म्हणजे भाजपचेच पाप

पाकिस्तानसोबत चर्चा केली जात नाही तोपर्यंत काश्मीर खोर्‍यात शांतता नांदणार नाही, असे वक्तव्य पीडीपीच्या नेत्या व जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केले होते. त्यावर संजय राऊत म्हणाले, हे पाप भाजपचेच आहे. फुटीरतावाद्यांना मदत करणार्‍या पीडीपीसोबत भाजपने युती करून सत्ता उपभोगली.

Back to top button