अजित पवार म्हणाले, दरेकरांना जे जमले, ते कोणालाच जमले नाही! | पुढारी

अजित पवार म्हणाले, दरेकरांना जे जमले, ते कोणालाच जमले नाही!

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : सहकार क्षेत्रात काम करणारे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना गुंतवणूक कधी करायची आणि कधी काढायची, याची पक्‍की जाण आहे. मागील सहा वर्षांच्या संसदीय राजकारणात जे त्यांना जमले, ते भाजपच्या इतरांना जमले नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोपरखळी मारताच सभागृहात जोरदार हशा पिकला.

सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षेनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, संजय दौंड, दिवाकर रावते, सदाभाऊ खोत, सुरजितसिंह ठाकूर, विनायक मेटे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ 7 जुलै रोजी संपणार आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी सभागृहात निरोपावेळी केलेल्या भाषणात उपमुख्यमंत्र्यांनी जोरदार टोलेबाजी केली.

ते म्हणाले, एकेकाळी दरेकर हे मनसेत राज ठाकरे यांच्याजवळ होते; पण योग्यवेळी तेथून बाहेर पडत ते भाजपमध्ये दाखल झाले आणि भाजप नेतृत्वाच्या इतके जवळ पोहोचले की, आधीच्या भाजपवाल्यांनाही कळले नाही. अशी किमया प्रत्येकाला जमत नाही. नरेंद्र मोदींच्या काळात भाजपने जितकी प्रगती केली, त्यापेक्षा जास्त वेगात दरेकरांनी प्रगती साधली. त्यांना हे कसे जमते, असा प्रश्‍न भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनाही पडला आहे, अशी फटकेबाजी करत पवार यांनी सभागृहाचे वातावरण बदलून टाकले.

प्रत्येक सदस्याची आपल्या शैलीत खास ओळख सांगत त्यांनी विरोधकांनाही जवळ केले. सभापतींच्या क्रिकेट प्रेम आणि कौशल्याचे किस्से सांगत भाषणाची सुरुवात करणार्‍या पवार यांनी प्रसाद लाड यांना चिमटे काढले.

लाडपण दरेकरांसारखेच आहेत. आमच्याकडे होते तेव्हा ते आमच्या खूपच जवळ आले होते. आता भाजपमध्येही श्रेष्ठींच्या जवळ आहेत. त्यांच्या नावात प्रसाद पण आणि लाडही. कोणी कोणाला प्रसाद दिला आणि कुणाचे लाड केले, हे सांगता येत नाही. पवारांच्या या राजकीय षटकारावर लाडांसह सगळेच हसू लागले.

सदाभाऊंचा रापलेला चेहरा उजळला!

सदाभाऊ खोत यांच्यावरील भाषणावर खुद्द खोत यांना हसू आवरता येत नव्हते. अजित पवार म्हणाले, शेतकरी संघटनेतून पुढे आलेले सदाभाऊ भाजपमध्ये आले आणि राजू शेट्टींसोबतचा हात सुटला. आता ते एकटेच खूप पुढे जात आहेत. अलीकडे आमच्या जयंत पाटील यांच्याशी खूप वेळ बोलत असतात. आधी या दोघांचे फार काही जमायचे नाही.

आता इतका वेळ काय बोलत असतात कुणाला माहीत! आता सदाभाऊ बदलले आहेत. त्यांचा पेहराव तर बदललाच; शिवाय त्यांचा पांढरा शर्ट अधिक शुभ्र होत आहे. आता त्या शर्टाची घडी मोडत नाही. व्यवस्थित असते. आधी आंदोलनामुळे रापलेला त्यांचा चेहरा सभागृहातल्या एसीमुळे उजळला आहे. त्यांचे हे तेज कायम राहू दे, अशी मिश्किली पवारांनी केली.

रावतेंच्या भाषणाने सदस्य भावुक

शिवसेनेचे सदस्य दिवाकर रावते यांच्या निरोपाच्या भाषणाने अनेक सदस्य भावुक झाले. ते म्हणाले, शेतकर्‍यांचे अश्रू मी पाहिले आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांसोबत मी प्रत्येक दिवाळीत असतो. एका वर्षी या विधवा बहिणींनी मला ओवाळले. तोच सदरा घालून मी सभागृहात आलो होतो. त्यावेळी त्या सदर्‍याकडे सर्व सदस्य पाहत होते. तो सदरा आपण जपून ठेवला असून, मेल्यावर तो सदरा मला घालण्यात यावा.

Back to top button