ईडीकडून गोवावाला कंपाऊंड मध्ये 3 तास तपासणी | पुढारी

ईडीकडून गोवावाला कंपाऊंड मध्ये 3 तास तपासणी

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडमध्ये मंगळवारी तीन तास शोधमोहीम राबवली. यावेळी ईडीच्या अधिकार्‍यांनी सोबत काही कागदपत्रे आणि नकाशे आणले होते. येथील वयोवृद्ध नागरिकांकडे चौकशी करून माहिती घेतली आहे.

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यासह त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील सदस्यांच्या मालमत्ता, बेनामी संपत्ती, सट्टेबाजी, खंडणी वसुली, ड्रग्ज आणि हवाला रॅकेट यातील आर्थिक बाबींच्या संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात ईडी तपास करत आहे. कुर्ला येथील गोवावाला कंपाऊंड जमीन दाऊदची बहीण हसीना पारकर हिने बळकावली होती. नवाब मलिक यांनी हसीना पारकर हिच्याकडून कवडीमोल भावात खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणात ईडीने नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारीला अटक केली होती. सध्या ते आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

कुर्ल्यातील लालबहादूर शास्त्री मार्गावर तीन एकरामध्ये गोवावाला कंपाऊंड पसरलेेले आहे. या ठिकाणी ईडीचे पथक सीआरपीएफ जवानांसोबत आले होते. मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांच्यासंदर्भात काही तक्रारी ईडीकडे आल्या होत्या. त्या अनुषंगाने चौकशी आणि तपासणी करण्यासाठी हे पथक आल्याचे बोलले जाते.

Back to top button