इथेनॉलवर भर न दिल्यास साखर उद्योगावर संकट : नितीन गडकरी | पुढारी

इथेनॉलवर भर न दिल्यास साखर उद्योगावर संकट : नितीन गडकरी

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : साखर कारखानदारांनी इथेनॉल उत्पादनाकडे लक्ष द्यावे. केवळ साखर उत्पादनाकडेच लक्ष दिल्यास आगामी काळ उद्योगासाठी संकटाचा ठरेल, असा इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिला. साखर आणि इथेनॉल इंडिया कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते.

आपण सध्या 465 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन करत आहोत. ई-20 कार्यक्रम पूर्ण होईल, तेव्हा आपली गरज सुमारे 1500 कोटी लिटरची होईल. शिवाय, येत्या पाच वर्षांत, फ्लेक्स इंजिनाची निर्मिती झाल्यानंतर इथेनॉलची मागणी 4000 कोटी लिटर होईल. त्यामुळे साखरेचे इथेनॉलमध्ये रूपांतर केले नाही आणि फक्त साखरेचे उत्पादन सुरू ठेवल्यास कारखाना तोट्यात जाईल, या धोक्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

टोयोटा, ह्युंदाई आणि सुझुकी यांनी सहा महिन्यांत फ्लेक्स इंजिन बाजारात आणण्याचे आश्‍वासन दिले आहे. इथेनॉल भरण्यासाठी बायोफ्युएल आऊटलेट उघडण्याचा निर्णय घेतला आहे. कार, स्कूटर, मोटारसायकल आणि फ्लेक्स इंजिनवरील रिक्षा लवकरच बाजारपेठेत उपलब्ध होतील, असे गडकरी यांनी सांगितले.

विमान वाहतूक क्षेत्रात आणि भारतीय हवाई दलात इथेनॉलचा वापर वाढवण्याच्या मार्गांवर सरकार विचार करत आहे. हवाई दलप्रमुख आणि संरक्षण मंत्रालयाच्या अधिकार्‍यांशी चर्चा सुरू आहे, असे ते म्हणाले.

आपल्याला फक्त धान्य पुरवठादार राहून चालणार नाही. शेतकर्‍यांना वीज पुरवठादार बनवण्याची गरज आहे.कारण सध्या आपल्याकडे धान्य मुबलक आहे आणि वीज तुटवडा आहे. येत्या काळात पडीक जमिनीवर बांबू लागवड करण्याची संधी आहे. बांबू पांढर्‍या कोळशाच्या स्वरूपात वापरला जाऊ शकतो. त्यामुळे कोळशाची आयात कमी होण्यासही मदत होईल, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले.

पेट्रोलियम आयातीचा वाढता भार

पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीवर सध्या आठ लाख कोटी रुपये खर्च होतो; तो पुढील पाच वर्षांत 25 लाख कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मोठी आर्थिक समस्या निर्माण होईल. एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधनाचा ओघ आल्याने नवीन समस्या पुढे येेतील. त्यामुळे आयातीला पर्याय, किफायतशीर, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी उपायांचा अवलंब करण्याची गरज असल्याचे नितीन गडकरी यांनी नमूद केले. इथेनॉल आणि हरित इंधनाचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले.

Back to top button