कोपरखैरणे : शेअर मार्केटशी काहीही संबंध नसताना केवळ 'शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, भरघोस परतावा मिळवा' अशा जाहिरातीला बळी पडून फसवणूक होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. नवी मुंबईतील एका व्यक्तीची अशाच प्रकारे तब्बल १३ कोटी ५६ लाख ४४९ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
खारघर येथे राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाला समाज माध्यमात एक जाहिरात दिसली. या जाहिरातीत शेअर बाजारात गुंतवणूक करा आणि भरघोस नफा कमवा असे आमिश दाखवण्यात आले होते. त्याला भुलून या बांधकाम व्यावसायिकाने १६ जानेवारी ते ८ ऑगस्ट दरम्यान तब्बल १३ कोटी ५६ लाख ४४९ रुपयांची गुंतवणूक केली.
मात्र, अनेकदा मागूनही परतावा न दिल्याने शेवटी आपली फसवणूक होत असल्याची खात्री व्यावसायिकाला पटली. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याची दखल घेत पोलिसांनी संबंधित अनोळखी चार आरोपींच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.