शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड | पुढारी

शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर आता केंद्रीय तपास यंत्रणांनी आपला मोर्चा शिवसेनेकडे वळवला आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या घर आणि मालमत्तेवर छापेमारी सुरु केली आहे.

आयकर विभागाचे अधिकारी सीआरपीएफ जवानांसह सकाळीच यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरी दाखल झाले. छापेमारी करत या अधिकाऱ्यांनी घरातच यशवंत जाधव यांची चौकशी सुरु केल्याचे समजते. सध्या त्यांच्या घरात कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. परंतु, यशवंत जाधव यांची नेमकी कोणत्या प्रकरणात चौकशी सुरू आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी यशवंत जाधव यांना नोटीस पाठवली होती, त्यानुसार ही छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळते.

यशवंत जाधव हे गेल्या पाच वर्षांपासून पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून सातत्याने केला जात होता. त्यामुळे आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यानंतर शिवसेनेचा आणखी एका नेता केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जातो.

विशेष म्हणजे नवाब मलिक यांच्यावरील कारवाईनंतर मंत्रालयाशेजारी झालेल्या महाविकास आघाडीच्या धरणे आंदोलनात यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव सहभागी झाल्या होत्या. त्याच्याच दुसऱ्या दिवशी यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी झाल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

Back to top button