पाऊस! कोल्हापूरसह कोकणात मुसळधार, अनेक ठिकाणी पूरस्थिती | पुढारी

पाऊस! कोल्हापूरसह कोकणात मुसळधार, अनेक ठिकाणी पूरस्थिती

पुढारी ऑनलाईन डेस्क; राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. कोकणातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, ठाणे येथे मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
मराठवाडा, विदर्भात देखील हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत.

मुंबई आणि उपनगरांमध्येही बुधवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. यामुळे काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत आहे.

वाशिष्ठी, शिव नदीला पूर…

रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण जलमय बनले आहे. पावसाने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहर जलमय झाले असून २००२ ची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती नागरिकांना लागून राहिली आहे.

चिपळून शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे.

कोकणाकडे जाणारी वाहतूक ठप्प…

बुधवारपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे कोल्हापूर-गगनबावडा हा राज्यमार्ग तर कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग बंद झाला आहे. रत्नागिरी महामार्ग बंद झाल्याने कोकणाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

बुधवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने गुरुवारी रात्रीपासून जोर पकडला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने मार्ग बंद झाले आहेत.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुवांधार…

महाराष्ट्राची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गुरुवारी पहाटेपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात प्रतिसेकंद तब्बल दीड लाखांहून अधिक क्युसेक पाण्याची आवक होऊ लागली आहे.

बुधवार सायंकाळी पाच वाजता धरणात ५८.५१ टीएमसी पाणी होते. गुरुवारी सकाळी सहा वाजता धरणात ६६.७५ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता.

बदलापूर पश्चिम भागाला पुराचा जोरदार तडाखा…

गेल्या बारा तासांपसून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे बदलापूर पश्चिम भागाला पुराचा जोरदार तडाखा बसला आहे. बदलापूर पश्चिमेकडील रमेश वाडी, हेंद्रेपाडा, मांजर्ली, बाजारपेठ, मोहनानंद परिसर, शनिनगर बदलापूर गावातील भागाला पावसाचा तडाखा बसला आहे. येथील तळ मजले पाण्याखाली गेले असून रस्त्यावर उभी असलेली वाहने, दुकानांमध्ये रात्री पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

हे ही वाचा :

 

 

Back to top button