कार्ल्यानजीक अपघातात मुंबई, ठाण्याचे 5 जण ठार | पुढारी

कार्ल्यानजीक अपघातात मुंबई, ठाण्याचे 5 जण ठार

कार्ला ; पुढारी वृत्तसेवा : जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कार कंटनेरवर धडकून झालेल्या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी सकाळी कार्ला फाट्याजवळील शिलाटणे गावच्या हद्दीत घडली. अपघातात ठार झालेले चार जण एकाच कुंटुबातील सदस्य होते. ते सर्व जण मीरा रोड येथे राहणारे होते. तर अन्य एक जण मस्जिद, मुंबई येथील होता. या अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

रिहान रिझवान अन्सारी (30, रा. सुफलाई इस्टेट, बिलाई मस्जिद, मुंबई), महावीर किसनराज तिलोक (43), शालिनी रुपनारायण तिलोक (20), सीमा किसनराज तिलोक (32), मच्छीदेवी नाथुराम तिलोक (65, सर्व मूळ रा. राजस्थान, सध्या सर्व रा. शांती पार्क मीरा रोड, ठाणे) अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मुंबईहून पुण्याकडे भरधाव जाणार्‍या फोर्ड इको स्पोर्ट्स गाडीच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार मार्गामधील दुभाजक ओलांडून पुण्याहून मुंबईकडे जाणार्‍या कंटेनरवर धडकली. ही कार कंटेनरखाली घुसल्याने तिचा चुराडा झाला. या धडकेत कारमधील पाचही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

तिलोक कुटुंबीय मच्छीदेवी यांना उपचारासाठी घेऊन कोल्हापूरकडे निघाले होते. पोलिसांनी देवदूत आपत्कालीन पथक व आयआरबीच्या रुग्णवाहिका पथकाच्या मदतीने कंटेनरमध्ये घुसलेली अपघातग्रस्त कार बाहेर काढून त्यातील पाचही प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर दोन्ही अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत केली.

मुंबईहून पुण्याकडे जाताना कारचालकाचा ताबा सुटला आणि दुभाजक ओलांडून कार पलीकडे गेली. समोरून येणार्‍या कंटेनरवर धडकत त्याच्या खाली गेली. त्यामुळे कारचा पूर्णत: चुराडा झाला. त्यातील सर्वच्या सर्व पाच जण जागीच ठार झाले. या अपघातानंतर जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.

Back to top button