काँग्रेस मंत्र्यांची सरकारविरोधात खदखद सुरूच | पुढारी

काँग्रेस मंत्र्यांची सरकारविरोधात खदखद सुरूच

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मंत्री नितीन राऊत, विजय वडेट्टीवार यांच्यापाठोपाठ, अमित देशमुख, यशोमती ठाकुर यांनीही सरकारवर कोरडे ओढले आहेत. राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीआधीच सरकार विरोधात तिरंदाजी करणार्‍या काँग्रेसने एक प्रकारे स्वबळाची तयारी चालविली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

ग्राम विकास व पाणीपुरवठा विभागाकडे ऊर्जा विभागाची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. ऊर्जा विभागाने अनेकदा पाठपुरावा करूनही थकबाकी मिळत नाही त्यामुळे थकबाकीपोटी राज्य अंधारात गेल्यास एकटी काँग्रेस जबाबदार राहणार नाही. त्याला राष्ट्रवादी आणि शिवसेनाही जबाबदार राहील, असा इशारा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सरकारला दिला होता.

तर ओबीसींच्या आरक्षणाबाबत आपण ओबीसी खात्याचा मंत्री असतानाही आपल्याला माहिती मिळत नसल्याची खदखद विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. या दोन ज्येष्ठ मंत्र्यांनी एका मागोमाग एक सरकारवर निशाणा साधला असताना, मंगळवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सरकारविषयी नाराजी व्यक्त केली.

ते म्हणाले,महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला न्याय मिळत नाही, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. तसेच कार्यकर्त्यांची समाजपयोगी कामे होत नाहीत, हे कार्यकर्त्यांच्या चेहर्‍याकडे पाहिल्यानंतर मला जाणवले. कार्यकर्त्यांची भावना दूर करायची असेल तर आम्हाला अधिक आक्रमकपणे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भूमिका मांडावी लागेल.

महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्य महिला आयोगाच्या कार्यक्रमात बोलताना, मोठ्या प्रकल्पांना पैसे मिळाले नाहीत तरी चालतील, पण राज्यातील गरीब, वंचित, अनाथ मुलांना आणि महिलांना निधी मिळालाच पाहिजे, असे ठणकावून सांगितले.

महिला आणि बालकांच्या विकासासाठी लागणार्‍या निधीबाबत मी नेहमीच आक्रमक असते. अनाथ मुले, एकल महिला यांचे प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. महिला आणि मुलांच्या विकासासाठी लागणार्‍या निधीसाठी आपण कायम भांडत राहू, असेही ठाकूर म्हणाल्या.त्यामुळे सरकार विरोधातील त्यांच्या या विधानामागे काँग्रेस पक्ष असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील इतर महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका काँग्रेसला स्वबळावर लढवायच्या आहेत. त्यामुळे काँग्रेसने आतापासूनच वातावरण तापवायला सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे.

Back to top button