KDMC : चैनीसाठी 'केडीएमसी' कर्मचार्‍याच्या पत्नीने मैत्रिणीसोबत केली चोरी! ९ गुन्ह्यांचा छडा | पुढारी

KDMC : चैनीसाठी 'केडीएमसी' कर्मचार्‍याच्या पत्नीने मैत्रिणीसोबत केली चोरी! ९ गुन्ह्यांचा छडा

डोंबिवली – पुढारी वृत्तसेवा

केडीएमसी (KDMC) मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पत्नीचं चोर निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे महागड्या साड्या आणि चांगल्या दागिन्यांची हौस भागवण्यासाठी बाजारात खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलांच्या हातातील पर्स ती चोरी करत होती. इतकेच नव्हे तर या महिलेने स्वतःच्या मैत्रिणीला देखील यात सामील करून घेतले. कल्याण क्राइम ब्रॅंचने सीसीटीव्हीच्या साहाय्याने  संशयित आराेपी आरती पाटील हिला अटक केली आहे.

कल्याण डोंबिवलीत चैन स्नेचिंग, घरफोडी, बाईक चोरीचे प्रमाण काही दिवसांपासून वाढले आहे. काही दिवसांपासून बाजारात, गर्दीच्या ठिकाणी महिलांची पर्स चोरी करून अज्ञात चोरटा पसार होत होता. कल्याण क्राईम ब्रॅंच पोलीस चोरट्याच्या शोधात होते. कल्याण क्राइम ब्रॅंचचे पोलीस अधिकारी भूषण दायमा, पोलीस निरीक्षक मोहन कळमकर, पोलीस कर्मचारी विनोद चन्ने, किशोर पाटील यांच्या पथकाने कल्याण डोंबिवलीतला बाजारात गर्दीच्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासून पाहिले. एका ठिकाणी एक महिला ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद झाली हाेती. जवळपास दोन महिने पोलीस या महिलेच्या शोधात होते.

महागड्या साड्या, दागिने आणि हॉटेलमध्ये जेवणाची हौस

क्राइम ब्रॅंचचे पोलीस कर्मचारी विनोद चन्ने यांच्या गुप्त माहितीच्या आधारावर या महिलेची ओळख पटली. सदर महिला डोंबिवलीच्या टीएमटी कॉलनी परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. क्राइम ब्रॅंच पोलिसांनी  महिलेच्या घरात जाऊन तिला अटक केली. महिलेच्या अटकेनंतर जी माहिती समोर आली ती ऐकून पोलीस हैराण झाले. आरतीचे पती केडीएमसी (KDMC)मध्ये कर्मचारी आहेत. तिला महगड्या साड्या, महागडे दागिने, मोठं मोठ्या हॉटेल मध्ये जेवण करण्याची हौस होती. हीच हौस पूर्ण करण्यासाठी ती चाोर्‍या करु लागली.  बाजारात गर्दीच्या ठिकाणी खरेदीसाठी आलेल्या महिलांवर नजर ठेवुन त्यांच्या पर्सला ब्लेड मारून पर्स चोरी करून पसार व्हायची.

कल्याण क्राइम ब्रॅंचने आरतीला ताब्यात घेत कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाणे यांनी केलेल्या तपासात एक बाब समोर आली: आरती सोबत मैत्रीण शालिनी पवारही होती. तीही चोरी करायची. शालिनी पवार हिला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी सांगितले  की, या दाेन महिलांकडून ९ गुन्ह्यांचा उकल करण्यात आली आहे. सुमारे १५ तोळे हस्तगत करण्यात आले असून, सुमारे ८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पाहा व्हिडिओ : कोल्हापूर महापालिकेचा सफाई कर्मचारी ठरला संकटातील प्राण्यांचा ‘दादा’

Back to top button