सेन्सेक्सची घसरण सुरूच; एका सत्रात 9.15 लाख कोटींचा चुराडा | पुढारी

सेन्सेक्सची घसरण सुरूच; एका सत्रात 9.15 लाख कोटींचा चुराडा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

सोमवारी सुरू झालेला नवा सप्ताह भारतीय शेअर बाजारांसाठी ‘काळा सोमवार’ ठरला. सकाळपासूनच दोन्ही प्रमुख शेअर बाजारांवर घसरण सुरू होऊन दिवसभरात त्यात जोरदार घसरगुंडी झालेली पाहावयास मिळाली. या केवळ एका सत्रामध्ये मुंबई शेअर निर्देशांक सुमारे 1,545.67 अंक म्हणजे 2.62 टक्के, तर निफ्टी 468.05 अंकांनी म्हणजे 2.66 टक्के इतके खाली कोसळलेले होते.

या केवळ एकाच सत्रामध्ये मुंबई शेअर निर्देशांकाचे मूल्य 2.69 लाख कोटी रुपयांवरून घसरून 2.60 लाख कोटी रुपयांवर घसरले. त्यात एका सत्रात तब्बल 9.15 लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला. गेल्या पाच सत्रांमध्ये मुंबई शेअर निर्देशांकामध्ये 3,820 अंकांची, तर निफ्टीमध्ये अशीच जोरदार घसरण झाली. गेल्या पाच सत्रांमध्ये मुंबई शेअर बाजारावरील भांडवली मूल्याची घसरण सुमारे 19.33 लाख कोटी रुपयांची झाली आहे. इतकी प्रचंड घसरण गेल्या कित्येक सत्रांमध्ये झालेली नव्हती.

गेल्या सलग पाच सत्रांमध्ये भारतीय शेअर बाजारांची अभूतपूर्व घसरण होत असून, सोमवारी सुरू झालेल्या नव्या सप्ताहाच्या प्रारंभीच ही जोरदार घसरण नोंदवली गेली. जागतिक पातळीवरील प्रतिकूल वातावरण या घसरणीला अधिक मारक ठरले. जागतिक पातळीवरील सर्व देशांमध्ये महागाईचा आगडोंब उसळलेला आहे. त्यातच रशिया व युक्रेन यांच्यातील वाढता तणाव आगीमध्ये तेल ओतणारा ठरत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया व डॉलर यांच्या विनिमय दरात रुपया अत्यंत क्षीण होत आहे. कालच्या सत्रात तो प्रतिडॉलर 74.4325 रुपये होता, तो सोमवारी 74.62 रुपयांवर घसरला. याचा अर्थव्यवस्थेला फटका बसत आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेचा सध्याचा व्याज दरही मारक ठरत आहे. या सप्ताहात त्यात थोडीफार जरी वाढ झाली, तरी त्याचा आणखी प्रतिकूल परिणाम भारतीय शेअर बाजारांवर व परदेशी वित्त संस्थांवर होण्याची शक्यता आहे. सोमवारच्या सत्रातील विक्रीचा मारा अभूतपूर्व होता. हाच कायम राहिला, तर पुढील दोन-तीन सत्रांमध्ये निर्देशांकांची घसरण कायम राहील, अशी चिन्हे आहेत.

या सत्रामध्ये सकाळी मुंबई शेअर निर्देशांक 59 हजार 23.97 अंक पातळीवर खुला झाला. दिवसभरात त्याने 59 हजार 23.97 अंकांची नवीन उच्चांकी पातळी नोंदवली. तसेच त्याने दिवसभरात 56 हजार 984.01 अंकांची नीचांकीही नोंदवली. मात्र, कालच्या सत्राच्या तुलनेत त्यात 1,545.67 अंकांची घसरण होऊन तो 57 हजार 491.51 अंक पातळीवर बंद झालेला होता. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या 50 प्रमुख कंपन्यांवर आधारलेला निफ्टी या सत्रात 17 हजार 575.15 अंक पातळीवर खुला झाला.

त्याने दिवसभरात 17 हजार 599.40 अंकांची उच्चांकी, तर 16 हजार 997.85 अंकांची नीचांकी पातळी नोंदवली. कालच्या सत्राच्या तुलनेत त्यात 468.05 अंकांची घट होऊन तो दिवसअखेरीस 17 हजार 149.10 अंक पातळीवर स्थिरावलेला होता. या सत्रात रिलायन्सचा भाव 4.06 टक्के घसरला, तर व्होडाफोन-आयडिया 7.98 टक्क्यांनी खाली कोसळला. या सत्रात सर्वच्या सर्व उद्योगांचे निर्देशांक खाली घसरलेले होते.

या सत्रामध्ये ‘अ’ गटातील 695 कंपन्यांपैकी 27 कंपन्यांची भाव पातळी वर गेलेली होती, तर 667 कंपन्यांचे भाव खाली घसरलेले होते. सत्रात एकूण 3,706 कंपन्यांमध्ये व्यवहार झाले. त्यापैकी 486 कंपन्यांची भाव पातळी वर गेलेली होती, तर 3,106 कंपन्यांमध्ये घसरण नोंदवली गेली. मात्र, 114 कंपन्यांचे भाव मात्र स्थिर होते. निफ्टीच्या 50 कंपन्यांपैकी 2 कंपन्यांची भाव पातळी वर गेली, तर 48 कंपन्यांमध्ये घसरण झालेली आढळली.

या सत्रात ‘अ’ गटातील एकाही कंपनीमध्ये भाववाढ झाली नाही. मात्र, या सत्रातील सर्वाधिक 0.48 टक्के 5.98 इतकी घसरण टाटा स्टील, विप्रो व रिलायन्स या कंपन्यांमध्ये झाली. यात सर्वाधिक व्यवहार रिलायन्स या कंपनीमध्ये झाले. त्यात 5 लाख 79 हजार 337 शेअर्समध्ये 140 कोटी 46 लाख रुपयांचे व्यवहार झाले. या सत्रात त्याचा उच्चांकी भाव 2,504.10 रुपये होता, तर त्याने 2,352.70 रुपयांची नीचांकी पातळी नोंदवलेली होती.

Back to top button