मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले, 'या' महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता - पुढारी

मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले, 'या' महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगरपालिकेची मुदत ८ मार्चला संपणार आहे. त्यामुळे ८ मार्च पूर्वी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. शुक्रवारी मुंबईत वाढणाऱ्या ९ प्रभागांसह प्रभाग पुनर्रचनेचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला महापालिकेने सादर केला. या आराखड्यावर हरकती सूचना मागवून तो प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल किंवा ऑक्टोबर २०२२ पर्यंत पुढे ढकलली जाईल असे सांगण्यात येत होते. पण ही निवडणूक महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी घेण्यात येणार असल्याचे समजते. महापालिका निवडणूक २५ फेब्रुवारी पूर्वी होणे अपेक्षित होते.

मात्र आता ही निवडणूक ५ मार्च पर्यंत होण्याची शक्यता आहे. मुंबई ९ नवीन प्रभाग तयार करण्यात आले असून हे प्रभात समाविष्ट करून प्रभाग पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ होणार आहे.

प्रभात पुनर्रचना करताना शहरातील २०११ च्या लोकसंख्येसह गेल्या ११ वर्षांत वाढलेल्या नव्या इमारती, वस्त्या, आणि नवी बांधकामे आदी गृहीत धरून, लोकसंख्येच्या घनतेचा आधार घेण्यात आला आहे.

मुंबई शहर, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगर याठिकाणी ३ प्रभाग वाढवल्याचे पालिका निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे.

शहरात लोअर परळ, वरळी सारख्या नवी बांधकामे आणि इमारती उभ्या राहिलेल्या परिसरात ३ प्रभाग वाढण्याची शक्यता आहे. तर, पूर्व उपनगरांत मानखुर्द, संघर्षनगर, माहूल याठिकाणी नवीन प्रभाग वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम उपनगरातही बोरिवली, मालाड, बांद्रा भागात प्रभाग वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Back to top button