नगरपंचायतींवर महाविकास आघाडीची सत्ता, भाजपचा नंबर वनचा दावा | पुढारी

नगरपंचायतींवर महाविकास आघाडीची सत्ता, भाजपचा नंबर वनचा दावा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील 106 नगरपंचायतींपैकी 97 नगरपंचायतींचे निकाल बुधवारी जाहीर झाले असून, त्यात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. महाविकास आघाडीला एकूण 58 जागी विजय मिळाला आहे. भाजपची 24 ठिकाणी सरशी झाली. या निवडणुकीत सर्वाधिक भाजपचे सदस्य निवडून आल्याने भाजपने नंबर वनचा दावा केला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक नगरपंचायती जिंकून आपणच नंबर एक असल्याचा प्रतिदावा केला आहे.

राज्यात मुख्यमंत्रिपद असलेली शिवसेना मात्र नगरपंचायती आणि सदस्यसंख्येतही चौथ्या स्थानी फेकली गेली आहे. नगरपंचायतींसाठी 18 जानेवारीला मतदान झाले होते. या निवडणुकांचे निकाल बुधवारी जाहीर झाले. त्यात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. हे पक्ष बहुतांश ठिकाणी स्वतंत्र लढले असले, तरी 97 पैकी तिन्ही पक्षांनी मिळून 58 ठिकाणी विजय मिळविला आहे. त्यात राष्ट्रवादीला 26, काँग्रेसला 18, तर शिवसेनेला 14 नगरपंचायतींत विजय मिळाला आहे.

भाजपने 24 नगरपंचायतींवर झेंडा फडकावला. स्थानिक आघाड्या व अपक्षांनी 6, तर 10 ठिकाणी कोणालाही बहुमत मिळाले नसल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. या निकालानंतर भाजप-राष्ट्रवादीने नंबर वनचा दावा केला आहे. तर काँग्रेसने कामगिरीवर समाधान व्यक्‍त केले आहे.

नगरपंचायतींच्या 1,638 जागांपैकी सर्वाधिक जागा मात्र भाजपने जिंकल्या आहेत. भाजपचे 384 सदस्य निवडून आले. राष्ट्रवादीचे 344, शिवसेनेचे 284, तर काँग्रेसचे 316 उमेदवार निवडून आले आहेत. अपक्षांनी या निवडणुकीतही चांगली बाजी मारली आहे. तब्बल 206 अपक्ष उमेदवार निवडून आले, मनसे आणि बसपला प्रत्येकी 4 जागांवरच समाधान मानावे लागले.

राज्य निवडणूक आयोगाने 1,649 पैकी बुधवारी 1,638 जागांचे निकाल जाहीर केले. गडचिरोलीतील 9 नगरपंचायतींची गुरुवारी मतमोजणी होईल.

Koo App

नगरपंचायत निवडणूकीत ४१७ जागा मिळवत भाजपा राज्यात पुन्हा एकदा नंबर १चा पक्ष ठरला आहे. मविआमधील तिन्ही पक्ष एकत्र जरी लढले तरी जनतेचा विश्वास हा भाजपासोबतच असल्याचे या विजयातून सिद्ध झाले.सर्व विजयी उमेदवारांचे,भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि मतदारांचे आभार!💐

Chandrakant Patil (@ChDadaPatil) 19 Jan 2022

या निवडणूक निकालाचा सर्वाधिक धक्‍का शिवसेनेला बसला आहे. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही सत्ताधारी मित्रपक्षांचे अधिक उमेदवार निवडून आले आहेत. लोकांशी संपर्क असलेली मंत्रिपदे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला दिल्याचा हा फटका असल्याची चर्चा शिवसेनेत सुरू झाली आहे.

ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे या घटकातील मतदारांच्या नाराजीचा सर्वच राजकीय पक्षांना फटका बसेल, अशी चर्चा होती. मात्र, काही ठिकाणी अपेक्षेपेक्षा अधिक ओबीसी उमेदवार निवडून आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यात आज लागलेल्या निकालामध्ये समाजाने ओबीसी आरक्षण रद्द होऊनही मोठ्या संख्येने ओबीसींना निवडून दिले आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात 17 जागांपैकी 12, नातेपुते 17 पैकी 12, तर माढामध्ये 17 पैकी 4 जागांवर ओबीसींनी विजय मिळविला आहे.

दिग्गजांना धक्‍का

या निवडणुकीत दिग्गज नेत्यांना मतदारांनी धक्‍का दिला आहे. कडेगाव नगरपंचायतीमध्ये सहकार राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांच्या वर्चस्वाला भाजपने धक्‍का देत ही नगरपंचायत जिंकली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायत जिंकण्यासाठी ताकद पणाला लावली होती; पण तेथे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विजय मिळवला. बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर, कासार आणि वडवणी नगर परिषदांवर भाजपने झेंडा फडकावत पालकमंत्री धनंजय मुंडे यांना धक्‍का दिला. केज नगरपंचायतीत काँग्रेसच्या राज्यसभा सदस्य रजनी पाटील यांचे वर्चस्व संपुष्टात आले.

कोरेगावमध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकीत माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना जिल्हा बँकेपाठोपाठ दुसरा धक्‍का बसला. येथे राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागला आहे. कर्जतमध्ये माजी मंत्री राम शिंदे यांना आमदार रोहित पवार यांनी धक्‍का देत विजय मिळवला.

औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगावमध्ये शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने 17 पैकी 11 जागा मिळवल्या आहेत, तर भाजपला केवळ 6 जागा मिळाल्या. हा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना धक्‍का मानला जात आहे.

यांनी गड राखले

सांगलीतील कवठेमहांकाळमध्ये आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे. रोहित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने या नगरपंचायतीत एकूण 10 जागांवर विजय मिळवला आहे. तर शेतकरी विकास गटाला 3 जागा मिळाल्या आहेत. सुमनताई पाटील यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याने त्या प्रचारात सहभागी झाल्या नव्हत्या.

मुरबाडमध्ये भाजप आमदार किसन कथोरे, देहूमध्ये राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके तसेच विदर्भात विद्यमान मंत्री विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, विजयसिंह मोहिते-पाटील आदींनी आपापले गड राखले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी नगरपंचायतीत अनपेक्षितपणे भाजपला पूर्ण बहुमत मिळाले आहे. यामागे शिवसेनेतील अंतर्गत वाद कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. विद्यमान शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या नाराजीचा फटका सेनेला बसला आहे.

‘या’ नेत्यांना बसला झटका

गोपीचंद पडळकर – खानापूर, खासदार रजनी पाटील – केज, विश्‍वजित कदम – कडेगाव, संजयकाका पाटील – कवठेमहांकाळ, राम शिंदे – कर्जत (अहमदनगर), विजय आवटी – पारनेर, रावसाहेब दानवे – सोयगाव, संभाजी निलंगेकर – देवणी, धनंजय मुंडे – आष्टी, पाटोदा, शिरूर, प्रा. जयंत पाटील – खालापूर, भरत गोगावले – तळा, रामदास कदम – मंडणगड, नितेश राणे – कुडाळ, शशिकांत शिंदे – कोरेगाव, शंभूराज देसाई – पाटण, मदन भोसले – खंडाळा.

फायर ब्रँड नेते अपयशी

फायर ब्रँड नेत्यांचा आपल्याला निवडणुकीत फायदा होईल, अशी अटकळ भाजपने बांधली होती; पण त्याचा भाजपला फारसा फायदा झाला नाही. गोपीचंद पडळकर आणि राणे पिता-पुत्रांमुळे भाजपला आपले संख्याबळ वाढवता आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संपूर्ण ताकद लावूनही नारायण राणे यांना कुडाळमध्ये धक्‍का बसला आहे. तेथे भाजप 8, शिवसेना 7, तर काँग्रेसने 2 जागा जिंकल्याने एकहाती सत्ता मिळवण्याचे केंद्रीय मंत्र्यांचे स्वप्न धुळीस मिळाले.

Back to top button