मुंबई : नोकरशहा-कंत्राटदार-दलालांच्या रॅकेटचे पुढे काय झाले? | पुढारी

मुंबई : नोकरशहा-कंत्राटदार-दलालांच्या रॅकेटचे पुढे काय झाले?

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : गेल्या ऑक्टोबरमध्ये मुंबईसह महाराष्ट्रात धाडी टाकून आयकर खात्याने नोकरशहा-उद्योजक आणि दलालांचे रॅकेट उघडकीस आणले आणि या रॅकेटची एकूण उलाढाल तब्बल 1 हजार 50 कोटींची असल्याचे खास प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केले होते. आता मात्र या छाप्यांची कोणतीही माहिती आपल्याकडे नाही, असे सांगत दिल्‍लीच्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस तथा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) मुंबईच्या आयकर महासंचालकांकडे बोट दाखवले आहे.

विशेष म्हणजे 7 ऑक्टोबर 2021 रोजी याच सीबीडीटीने खास परिपत्रक काढून या छाप्यांची तपशीलवार माहिती देत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. या पत्रकात सीबीडीटीने म्हटले होते की, सहा महिने माहिती गोळा केल्यानंतर आयकर खात्याने मुंबईसह महाराष्ट्रात ही शोधमोहीम राबवली.

25 निवासस्थाने, 15 कार्यालय परिसर आणि चार कार्यालये यांची झडती घेतल्यानंतर उद्योजक, मध्यस्थ दलाल आणि त्यांचे हस्तक तसेच नोकरशहा यांचे हे सिंडीकेट उघडकीस आले. नोकरशहांनी मलईदार पोस्टसाठी पैसे मोजले, कंत्राटदारांनी सरकारकडून बिल काढण्यासाठी मोठ्या रकमा मोजल्या, पुढे या रकमा निरनिराळ्या व्यक्‍तींना वाटल्या गेल्या. जप्त कागदपत्रांमधील नोंदीनुसार अनेक प्रकरणांमध्ये प्रत्येकी 200 कोटींची उलाढाल आढळली.

नोकरशहा आणि कंत्राटदार यांनी दलालांना मोजलेली रक्‍कम ही 1050 कोटींच्या घरात असून या रकमांचे वाटप करताना अंगडिया आणि हवाला रॅकेटचाही उपयोग करण्यात आल्याचे दिसते, असे सीबीडीटीने आपल्या पत्रकात म्हटले होते. बदल्या आणि कंत्राटांचे हे रॅकेट चालवण्यासाठी दलालांनी मुंबईत ओबेरॉय हॉटेलमध्ये काही सूट कायमस्वरूपी भाड्याने घेतल्याचेही आढळले, असेही या पत्रकात सीबीडीटीने नमूद केले.

पुढील तपास सुरू आहे, असे सांगत सीबीडीटीने आपल्या पत्रकाचा समारोप केला होता. ऑक्टोबरमध्ये हे भयंकर रॅकेट उघडकीस आणल्यानंतर गेल्या तीन महिन्यांत सीबीडीटीने किंवा आयकर खात्याने या प्रकरणी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे माहिती हक्‍क कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी या प्रकरणाचे पुढे काय झाले, अशी विचारणा करणारा अर्ज सीबीडीटी दिल्‍लीकडे गेल्या 20 डिसेंबर रोजी दाखल केला. त्याचे उत्तर 3 जानेवारी 2022 रोजी सीबीडीटीने दिले. आपण मागितलेली (मुंबईतील छाप्यांची) कोणतीही माहिती आमच्याकडे नाही.

मात्र ही माहिती मुंबईतील प्राप्तीकर महासंचालक (तपास) यांच्याकडे असू शकते, असे नमूद करून सीबीडीटीने वाटेगावकरांचा अर्ज मुंबईकडे रवाना केला. मुंबईच्या आयकर महासंचालकांसाठीही सीबीडीटीने या पत्रात खास सूचना देऊन ठेवली आहे. मुंबईतील ऑक्टोबरमध्ये जाहीर केलेल्या धाडसत्राची माहिती आपल्याकडेही नसल्यास हा माहिती हक्‍क अर्ज संबंधित अधिकार्‍यांकडे रवाना करावा व तसे वाटेगावकर यांना कळवावे, असे सीबीडीटीने सूचित केले आहे.

मुंबईच्या आयकर महासंचालकांकडून जानेवारी उलटत आला तरी यासंदर्भात उत्तर आलेले नाही. मात्र महाराष्ट्रातील कंत्राटदार, नोकरशहा आणि दलालांचे रॅकेट जाहीर करणारे पत्रक सीबीडीटी काढते आणि त्याच सीबीडीटीकडे या कारवाईची कोणतीही माहिती नाही ही गोष्टच चकित करणारी असल्याचे वाटेगावकर म्हणाले. आयकर कायद्यानुसार अशा छाप्यांची माहिती आयकर खात्याने सर्वसंबंधित विभागांना कळवणे बंधनकारक आहे.

मुंबई आयकर विभागाने ही माहिती अन्य खात्यांना कळवलेली नाही, असे गृहित धरावे तर या छाप्यांची माहिती सीबीडीटीने थेट दिल्‍लीहून पत्रक काढून जाहीर केली होती. आता या धक्‍कादायक रॅकेटचे पुढे काय झाले या प्रश्‍नाचे उत्तर देण्याऐवजी माहिती हक्‍काच्या अर्जाची टोलवाटोलवी सुरू झाली आहे, असे सांगून वाटेगावकर म्हणाले, हे प्रकरण दडपले जाऊ नये म्हणून एसीबीचे महासंचालक, राज्याचे मुख्य सचिव आणि केंद्रीय सचिवांना आपण नोटीस दिली आहे.

Back to top button