शाळांची घंटा पुन्हा लवकरच वाजणार | पुढारी

शाळांची घंटा पुन्हा लवकरच वाजणार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कोरोना संसर्गाच्या तिसर्‍या लाटेत रुग्णालयात दाखल होणार्‍यांची संख्या कमी आहे. त्यामुळे सध्या बंद असलेल्या शाळा उघडण्यावर सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या त्यासाठी सकारात्मक आहेत. या प्रस्तावावर गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले की, शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाच्या वतीने मंत्रिमंडळ बैठकीत सादर केला जाणार आहे. तिसर्‍या लाटेच्या प्रारंभी 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवल्या आहेत. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता, त्यापूर्वी शाळा उघडण्याचा निर्णय होऊ शकतो.

उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात असल्याने मंत्रिमंडळाची बैठक बुधवारऐवजी गुरुवारी होणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात असल्याने शाळा लवकर उघडण्याचा निर्णय होऊ शकतो, अला संंकेत यापूर्वीच दिला आहे.

मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या 20 हजाराच्या पुढे गेल्याने 10 जानेवारीला तातडीने शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र तेथील रुग्णसंख्या झपाट्याने खाली आली आहे. दरम्यान, राज्य कोरोना टास्क फोर्सच्या बैठकीतही यावर चर्चा होणार आहे. त्यात शाळा सुरु करण्याबाबत अनुकुलता दर्शविल्यास गुरुवारच्या बैठकीत तातडीने त्यावर निर्णय होऊ शकतो.

Back to top button