कोरोना : मुंबईतील रुग्णसंख्येत घट, तर पुण्यामध्ये वाढ | पुढारी

कोरोना : मुंबईतील रुग्णसंख्येत घट, तर पुण्यामध्ये वाढ

मुंबई : अजय गोरड : राज्यात गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्या स्थिर असून, सरासरी 40 ते 45 हजार कोरोनाबाधित आढळून येत आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात वेगाने रुग्णवाढ झाली. मात्र, दुसर्‍या आठवड्यात रुग्णवाढ दिसून आली; मात्र वाढीचा दर स्थिर असल्याचे दिसून आले. राज्यात सध्या दररोज सरासरी दोन लाखांहून अधिक कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. त्यात 40 ते 45 हजार रुग्णसंख्या आढळून येत असल्याने राज्याचा पॉझिटिव्हिटी (संसर्ग) दर 22 ते 25 टक्क्यांच्या घरात आहे.

राज्यात सध्या सर्वाधिक पॉझिटिव्हिटी दर पुण्याचा असून तो 27 ते 28 टक्के इतका आहे. मुंबईतील रुग्णसंख्या मागील सहा- सात दिवसांपासून घसरणीला लागली असून, पॉझिटिव्हिटी दर 28 टक्केवरून 17 ते 18 टक्के इतका खाली आला आहे.

महाराष्ट्रात 20 डिसेंबरपासून तिसरी लाट सुरू झाली. 20 डिसेंबर ते 31 जानेवारी या दहा दिवसांत राज्याची रुग्णसंख्या दैनंदिन 544 वरून 4 हजारांच्या घरात होती, तर पॉझिटिव्हिटी दर 0.65 टक्केवरून 3.27 टक्क्यांपर्यंत पोहोचला. मात्र, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली.

यात मुंबईतील रुग्णसंख्येचा वाटा 40 ते 50 टक्के इतका आहे. यावेळी मुंबईसह राज्यातील दुप्पट रुग्णवाढीचा दर 2 दिवसांवर आला. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील रुग्णसंख्या 9 हजारांहून 45 हजारांच्या घरात म्हणजेच पाचपट वाढली. आठवडाभरात 2 लाख 40 हजार रुग्ण नोंदवले गेले. त्यावेळी राज्याचा पॉझिटिव्हिटी दर 20 ते 22 टक्के, तर मुंबईचा 28 ते 29 टक्के इतका होता.

जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात दैनंदिन सरासरी 40 ते 42 हजार याप्रमाणे 3 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळले. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे या आठवड्यात रुग्णवाढीच्या दरात कमालीची घसरण होऊन ती स्थिर राहिली. दुसरीकडे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले. मुंबईतील रुग्णसंख्या तर 20 हजारांहून आता 10 हजारांच्या खाली आली आहे. मुंबईत दररोज 55 ते 60 हजारांच्या घरात चाचण्या होत असून, मुंबईचा सध्या पॉझिटिव्हिटी दर 17 ते 18 इतके खाली आला. आठवड्यात मुंबईच्या संसर्ग दरात 10 टक्के इतकी मोठी घट आल्याने मुंबईत तिसर्‍या लाटेचा ’पीक पॉईंट’ तर येऊन गेला नाही याची चर्चा सुरू झाली आहे.

पुणे शहरात दररोज 20 हजारांहून अधिक चाचण्या केल्या जात असून, साडेपाच हजारांच्या सुमारास रुग्णसंख्या आढळून येत आहे. पुणे शहराचा संसर्ग दर 27 ते 28 टक्के इतका आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आणि पुणे ग्रामीणमध्ये दररोज सरासरी पाच हजारांहून अधिक रुग्णसंख्या आढळून येत असून तेथील संसर्ग दर 20 टक्केहून अधिक आहे. राज्यातील उर्वरित भागात रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. मुंबईतील रुग्णवाढ ज्या वेगाने झाली आणि खाली येताना दिसत आहे तशी स्थिती राज्यातील ग्रामीण भागात दिसून येत नाही.

तिसरी लाट व संसर्गदराबाबत निष्कर्ष

राज्यातील उर्वरित निमशहरी पालिका क्षेत्रात व ग्रामीण भागात जानेवारीच्या तिसर्‍या व चौथ्या आठवड्यात वाढ होईल, असा तज्ज्ञ व आरोग्य अधिकार्‍यांचे अनुमान आहे.

आयसीएमआरने लक्षणे नसलेल्या नागरिकांनी चाचणी करण्याची गरज नसल्याचे सांगितल्याने संपर्कात (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) आलेल्या नागरिकांची तपासणी व चाचणी करणे थांबले. अर्थात राज्यात दररोज दोन लाखांहून अधिक चाचण्या होत असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते.

सध्या राज्याचा पॉझिटिव्हिटी दर 20 टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे राज्यात तिसरी लाट स्थिर होत असल्याचे मानले जाते. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार 10 टक्केपेक्षा अधिक संसर्ग दर धोकादायक पातळीत गणला जातो. त्यामुळे धोका कायम.

राज्यात आताच्या घडीला 2 लाख 65 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील केवळ 20 हजार रुग्णालयात भरती आहेत. यातील 4 हजार रुग्ण ऑक्सिजनवर, तर अडीच हजार आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.

कोरोनाबाधितांसाठी सध्या दररोज 200 मेट्रिक टन इतका ऑक्सिजन लागत आहे. राज्याची दररोजची ऑक्सिजन उत्पादन करण्याची क्षमता 2 हजार मेट्रिक टनहून अधिक आहे. त्यामुळे दररोजच्या उत्पादनाच्या केवळ 10 टक्के इतक्या ऑक्सिजनची गरज भासत आहे.

Back to top button