एकनाथ शिंदे विरूद्ध जितेंद्र आव्हाड; कार्यकर्तेही भिडले! - पुढारी

एकनाथ शिंदे विरूद्ध जितेंद्र आव्हाड; कार्यकर्तेही भिडले!

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : खारेगांव उड्डाणपुलाचे श्रेय कुणाचे यावरून ठाण्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड शनिवारी आमने-सामने आले. दोन मंत्र्यांमध्येच कलगीतुरा झाल्याने मग राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्येही घोषणाबाजी झाली.

महापौर नरेश म्हस्के यांनी जाहीर केलेले ‘मिशन कळवा’ हे आव्हाड यांना झोंबले, तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी घोषित केलेले ‘मिशन कमिशन’ शिंदे यांच्या जिव्हारी लागले. त्यातून शाब्दिक चकमकी झडल्या आणि शेवटी दोन्ही मंत्र्यांना आघाडीचा धर्म आठवला.

बहुचर्चित खारेगांव उड्डाणपुलाचे श्रेय घेण्यावरून सुरुवातीपासूनच शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद सुरू होता.त्यामुळे पुलाच्या उद्घाटन प्रसंगी दोन्ही मंत्री काय बोलणार याबाबत उत्सुकता होती. कळवा हा आव्हाड यांचा बालेकिल्‍ला मानला जातो. त्यात शिरकाव करण्याची व्यूहरचना शिवसेनेने आखली. त्याचा संदर्भ घेत आव्हाड महापौर नरेश म्हस्के यांच्यावर व्यासपीठावरूनच भडकले. आव्हाड म्हणाले, महापौरांचे मिशन कळवा काय आहे हे समजले नाही. महापौर नरेश म्हस्के तुम्ही चाणक्य आहात, नारदमुनी होऊ नका. 2009 साली आमदार झालो.

मात्र, विकास कामांसाठी कधीही निधी मागण्याची आवश्यकता भासली नाही. 2009 नंतर कळवा आणि मुंब्रा यांच्यात झालेली विकासकामे यातील फरक दिसून येईल. भास्कर नगरमधील रस्त्यासाठी विधानसभेत प्रश्‍न मांडल्यानंतर नगरविकास मंत्री भास्कर जाधव यांनी त्या रस्त्याला स्थगिती देता येणार नसल्याचे सांगितले. 20 वर्षांनंतर हा रस्ता झाला, याकडे आव्हाड यांनी लक्ष वेधले. खारेगांव उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरूनही आव्हाड यांनी नाराजी व्यक्‍त केली. या पुलाचे उद्घाटन पालकमंत्र्यांनी केले असते तरी आम्ही विरोध केला नसता;

मात्र या उद्घाटनाच्या पत्रिका छापताना आम्हाला विश्वासात घेणे आवश्यक होते, असे आव्हाड म्हणाले. एकनाथ शिंदे यांनीही मग राजकीय टोलेबाजी केली. शिंदे म्हणाले, पुलाचे श्रेय घेणे महत्त्वाचे नसून पूल तयार होऊन लोकांचे जीव वाचणे महत्त्वाचे आहे. लोकांच्या हिताचे काम करताना राजकीय जोडे बाजूला ठेऊन काम करायचे असते. कळवा मुंब्र्याचे प्रस्ताव आम्ही कधीच अडवले नाही. तब्बल 2 हजार कोटींचा निधी हा कळवा मुंब्य्राच्या विकासासाठी दिला आहे.

महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना कळवा मुंब्यात लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचे आहेत हे कधीच पहिले नाही, असे सांगून शिंदे यांनी मिशन कळवाचा खुलासा करत महापौरांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. शिंदे म्हणाले, महापौर हे सर्वांचे आहेत. त्यांच्यावर राग धरू नका मात्र विरोधी शानू पठाण यांनी देखील आघाडीचा धर्म पळाला पाहिजे असा सल्ला शिंदे यांनी दिला. आपल्या बोलण्यामुळे कोणाचे मन दुखावत असेल तर त्याची काळजी घ्या असा वडीलधारकीचा सल्ला एकनाथ शिंदे यांनी आपले खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांना दिला.

मैत्री राजकारणापलीकडची

एकनाथ शिंदे आणि आमची मैत्री राजकारण पलीकडची आहे, त्यात एक अबोलपणा आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे तुम्ही कधी याबाबत विचारा, असे आव्हाड खासदार श्रीकांत शिंदे यांना म्हणाले. निवडणुकीत महाविकासआघाडी होणार हे पहिल्या दिवसापासून बोलतोय, मी कधीही वागळे मिशन बद्दल बोललो नाही. आपला शत्रू कोण आहे, याचा विचार करून आपण एकत्र येऊया. ठाण्यात रस्त्यांवर खड्डे दिसतील पण, कळव्यात खड्डे दिसणार नाहीत.

तुम्ही निधी देता पण, कामावरही लक्ष ठेवावे लागते, असेही आव्हाड म्हणाले. आमची मैत्री आहे हे खरे आहे, हे सर्वांसमोर खुले आहे. पोटात एक आणि ओटात एक असे आम्ही कधीच वागत नाही. निवडणुकांमध्ये आम्ही दोघे पक्षाचे काम करतो पण निवडणूक संपल्यानंतर कोणतीही अढी ठेवत नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

कार्यकर्त्यांमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उड्डाणपुलाच्या लोकार्पणाचे बॅनर लावल्यानंतर मोठा हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला. काही वेळातच हा वाद फक्त बॅनरबाजीवर न थांबता एकमेकांसोबत भिडण्यापर्यंत जाऊन पोहोचला. आम्ही पाठपुरावा केला आणि बॅनरबाजी तुमची, असं सांगत दोन्हीकडील कार्यकर्ते भिडले. विशेष म्हणजे नगरसेवकांमध्येही जोरदार बाचाबाची झाली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक उमेश पाटील आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश साळवी शाब्दिक चकमक झाल्याचं दिसले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी आपापल्या मंत्र्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

खरं तर जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदेंच्या उपस्थित हा कार्यक्रम सुरू होण्याआधी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की झाल्यामुळे राज्यात जरी महाविकास आघाडी एकत्र असले तरी स्थानिक पातळीवरची खदखद पुन्हा बाहेर आली. या सगळ्या वादाला बॅनरबाजीवरून सुरुवात झाली. महाविकास आघाडीतील कार्यकर्ते आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेकदा कार्यकर्ते आमनेसामने आलेत.

तुम्ही चाणक्यच रहा, नारदमुनी होऊ नका

तुम्ही चाणक्य आहात हे मला माहीत आहे. तुम्ही चाणक्यच रहा, नारदमुनी होऊन आघाडीला सुरुंग लावू नका. जे काही कळवा मिशन तुम्ही हाती घेतले आहे ते फळाला येणारे नाही. राज्यात आघाडी सरकार सत्तारूढ आहे. हे लक्षात घेऊन यापुढे वागा. महापौरांचे कळवा मिशन काय आहे हे मला समजले नाही आणि समजून घेण्याची इच्छाही नाही.

– जितेंद्र आव्हाड,
गृहनिर्माण मंत्री, महाराष्ट्र राज्य

माजी खासदारांचे मिशन कमिशन काय आहे?

महापौरांचे मिशन कळवा म्हणजे आघाडी भक्कम करणे आहे. पण ठाणे महापालिकेवर शिवसेनेची सत्ता असताना माजी खासदार आनंद परांजपे यांनी मिशन कमिशन काय आणले आहे? आम्हालाही ते समजले नाही. तुम्ही मिशन कमिशनचे सांगताय. आतापर्यंत एवढे आयुक्त आले,पण मी एकही फाईल माझी म्हणून दिली नाही त्यामुळे कमिशनचा प्रश्न येतोच कुठे?

एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री,
तथा पालकमंत्री महाराष्ट्र राज्य

Back to top button