मुंबई : कौटुंबिक वादाला कंटाळून तीन वर्षांच्या मुलासह महिलेने केली आत्महत्या | पुढारी

मुंबई : कौटुंबिक वादाला कंटाळून तीन वर्षांच्या मुलासह महिलेने केली आत्महत्या

कुर्ला : कौटुंबिक वादाला कंटाळून एक महिलेने तिच्या साडे तीन वर्षांच्या मुलासह १५ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या मृत महिलेचे नाव श्रुती यशराज महाडिक (वय ३६) असून तिच्या मृत साडे तीन वर्षांचा मुलाचे नाव राजवीर महाडिक होते.

चेंबूर च्या लाल डोंगर परिसरात अल्टा विस्टा या इमारती मध्ये या महिलेचा आणि मुलाची मृतदेह आढळून आला आहे. कुर्ला कामगार नगर मध्ये राहणारी ही महिला घरगुती भांडणामुळे सुसाईड नोट लिहून (दि. १२ रोजी) आपल्या मुलाला घेऊन घराबाहेर पडली होती. ती घरी परतली नसल्याने सुसाईड नोट घेऊन तिच्या पतीने नेहरू नगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तेव्हा पासून नेहरू नगर पोलीस या महिलेचा शोध घेत होते.

नेहरू नगर पोलीस या बाबत तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून पोलिसांना ही महिला मुलाला घेऊन तिच्या आई वडिलांचे घर असलेल्या अल्टा विस्टा इमारती मधील बंद असलेल्या घरी आल्याचे समजले. मात्र पोलिसांनी दोन दिवस तिच्या या ठिकाणी शोध घेतला. ही महिला तिच्या मुलासह इमारती मध्ये दाखल झाली होती मात्र बाहेर पडताना दिसत नव्हती.

अखेर पोलिसांनी या इमारतीचा संपूर्ण परिसर शोधून काढला. इमारती चे सर्व सीसीटीव्ही फुटेज वारंवार पाहिले. अखेर एक सीसीटीव्ही मध्ये एक झाडाची फांदी झटक्याने तुटताना पोलिसांना दिसली आणि पोलिसांना त्या ठिकाण चा संशय आला. डोंगराची कपार आणि संरक्षक भिंत यांच्या मधून वाहत जाणाऱ्या नाल्यात पोलिसांनी शोध सुरू केला.

अखेर दोन तासांनी पोलिसांना या माय लेकराचे मृतदेह हाती लागले. त्यांचा मृतदेह अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढून शवविच्छेदन साठी जेजे रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. सदर इमारत ही चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पुढील तपास आता चुनाभट्टी पोलीस करीत आहे. मात्र भांडणाच्या क्षुल्लक कारणावरून या महिलेने आपल्या लहान मुलासह आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

Back to top button