मुंबई बँकेत महाराष्ट्र विकास आघाडी ची पुनरावृत्ती | पुढारी

मुंबई बँकेत महाराष्ट्र विकास आघाडी ची पुनरावृत्ती

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : गुरुवारी झालेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने बिनविरोध निवडून आलेल्या सहकार पॅनलशी दगाबाजी करत महाराष्ट्र विकास आघाडी ची पुनरावृत्ती केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे निवडून आले, तर सहकार पॅनलचे उमेदवार आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड फक्त दोन मतांनी पराभूत झाले. शिवसेना, राष्ट्रवादीने केलेल्या या दगाबाजीतही भाजपचे विठ्ठलराव भोसले उपाध्यक्षपदी निवडून आले.

भारतीय जनता पक्षाला आणि सहकार पॅनलच्या सर्व जागा आपल्या नेतृत्वात जिंकून देणारे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना हा मोठा धक्का असून, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई बँकेत केलेल्या धक्कातंत्राच्या प्रयोगाची सहकार क्षेत्रात उलटसुलट चर्चा आहे.

सहकार पॅनल तथा भाजपकडून आमदार प्रसाद लाड अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरले होते. मात्र, अवघ्या दोन मतांनी त्यांचा पराभव करीत राष्ट्रवादी काँग्र्रेसचे सिद्धार्थ कांबळे 11 मते घेऊन निवडून आले. मात्र, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपकडून रिंगणात उतरलेले सहकार पॅनलचे विठ्ठलराव भोसले निवडून आले. भोसले आणि शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर यांना समसमान म्हणजे प्रत्येकी 10 मते पडली. ईश्वर चिठ्ठीचा कौल भोसले यांच्या बाजूने मिळाला.

सहकारने वर्चस्व राखले पण…

मुंबई बँकेच्या 21 संचालकांच्या निवडणुकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल उतरले होते. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना असे सर्वपक्षीय पॅनल असल्यामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका दरेकर यांनी घेतली.

त्यानुसार रणनीती आखत सहकार पॅनलचे तब्बल 17 संचालक दरेकर यांनी बिनविरोध निवडून आणले. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 9, तर शिवसेनेच्या 2 उमेदवारांचाही समावेश होता. उर्वरित 4 जागांसाठी मतदान झाले. या चारही जागा सहकार पॅनलनेच जिंकल्या. त्यामुळे दरेकर यांनी मुंबई बँकेवर सहकार पॅनल निवडून आणत आपले वर्चस्व राखले, असे चित्र निर्माण झाले.

बिनविरोधचा फायदा घेत आघाडी

प्रत्यक्षात दुसरीकडे पडद्यामागे मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीने महाराष्ट्र विकास आघाडीच्या हालचाली सुरू केल्या. भाजपला म्हणजेच विरोधी पक्षनेते म्हणून प्रवीण दरेकर यांना मुंबई बँकेच्या सत्तेतून बाजूला करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेत राष्ट्रवादीशी छुपी युती केली.

त्यासाठी आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि भाजप प्रणित सहकार पॅनलमधून बिनविरोध निवडून आलेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे संचालकदेखील उपस्थित होते.

याच बैठकीत मुंबई बँकेत शिवसेना-राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र विकास आघाडीचा प्रयोग करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येते. ठाकरे-पवारांच्या या डावाची कुणकुण लागल्याने दरेकर यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरवले होते. फक्त दोन मतांनी लाड यांची अध्यक्षपदाची संधी हुकली.

शिवसेनेने काय कमवले?

भाजपला मुंबई बँकेच्याही सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेने दोन्ही काँग्रेसशी हातमिळवणी केली. त्यामुळेच राष्ट्रवादीचा अध्यक्ष निवडून आला. मात्र, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अभिषेक घोसाळकर पराभूत झाले आणि भाजपचे विठ्ठलराव भोसले जिंकले. शिवसेनेने गद्दारी करूनही भाजपकडे उपाध्यक्षपद आले. शिवसेनेच्या दगाबाजीचा फायदा राष्ट्रवादीलाच झाला. शिवसेनेला कोणतेही सत्तापद मिळाले नाही.

सत्तेचा गैरवापर : दरेकर

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या निवडणुक निकालावर तीव्र प्रतिक्रिया देत सांगितले की, मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपशी युती करून जागा जिंकणार्‍या शिवसेनेने ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसशी संधान साधले आणि महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केले.

त्याचीच पुनरावृत्ती शिवसेनेने मुंबई बँकेतही केली. सहकारात राजकारण नको, असे स्व. वसंतदादा पाटील म्हणायचे. त्या विचारांचे बोट धरून प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आणि 17 संचालक सहकार पॅनलचे बिनविरोध निवडून आणले. नंतरच्या मतदानात 4 जागाही जिंकल्या. इथपर्यंत हे पक्षविरहित राजकारण होते.

मात्र, शिवसेनेने आमच्याशी पुन्हा गद्दारी केली. बँकेची सत्तासूत्रे हाती घेण्यासाठी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला. अनेक मतदारांना चौकशांचा ससेमिरा मागे लावण्याच्या धमक्या देण्यात आल्या. शिवसेनेच्या या गद्दारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष निवडून आला असला तरी आम्ही आमचा उपाध्यक्ष निवडून आणला याचा आनंद आहे. बँकेत शिवसेना-राष्ट्रवादीच्या सत्तेच्या राजकारणावर आम्ही अंकुश ठेवू, अशी ग्वाहीदेखील दरेकर यांनी दिली.

Back to top button