कुख्यात दाऊद इब्राहिम याचा पुतण्या सोहेल कासकर अमेरिकेतून पसार! - पुढारी

कुख्यात दाऊद इब्राहिम याचा पुतण्या सोहेल कासकर अमेरिकेतून पसार!

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर याचा पुतण्या सोहेल कासकर याला भारतात परत आणण्याचे भारतीय तपास यंत्रणा आणि मुंबई पोलिसांचे प्रयत्न अखेर निष्फळ ठरले आहेत. अमेरिकन तपास यंत्रणेने नार्को टेररिझम प्रकरणात तीन वर्षांपूर्वी सोहेलला स्पेनमध्ये अटक केली होती. आता तो दुबईमार्गे पाकिस्तानात पोहोचल्याचे उघड झाल्यानेे हा भारतीय यंत्रणांसाठी मोठा धक्का समजला जातो.

सोहेल हा दाऊद इब्राहिम याचा भाऊ नूरा कासकर याचा मुलगा आहे. मूत्रपिंड निकामी झाल्याने 2010 मध्ये नूराचा पाकिस्तानात मृत्यू झाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोहेल हा सुरुवातीला हिरे तस्करीमध्ये सक्रिय होता. हिर्‍यांच्या तस्करीतच त्याला दक्षिण आफ्रिकेत अटक करण्यात आली होती. एका वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर सोहेलने दानीशसोबत मिळून शस्त्रास्त्रांची तस्करी सुरू केली.

हे दोघेही स्पेनला असताना अमेरिकन यंत्रणांच्या रडारवर आले होते. अमेरिकन पोलिसांनी सोहेलसोबत दानीश अली यालाही अटक केली. त्यापैकी दानीशला भारतात आणण्यात यश आले. भारतीय यंत्रणा आणि मुंबई पोलीस सोहेलला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. : त्यासाठी मुंबई पोलीस अमेरिकन यंत्रणांच्या सतत संपर्कात असतानाही सोहेल अमेरिकेतून निसटला आणि थेट पाकिस्तानात पोहोचला.

संभाषण हाती लागले

अलीकडेच सोहेलचे एक संभाषण मुंबई पोलिसांच्या हाती लागले आणि त्याच्या अमेरिकेतून सुटकेचा उलगडा झाला. सोहेल कासकर हा 2018 मध्येच अमेरिकेतून दुबईमार्गे पाकिस्तानला पळून गेल्याचे स्पष्ट झाले आहे. दाऊद टोळीने भारतीय यंत्रणांना दिलेला हा मोठा धक्का समजला जातो. सोहेलच्या सुटकेमुळे भारतीय गुप्तचर आणि तपास यंत्रणा, मुंबई पोलीस आणि अमेरिकन यंत्रणा यांच्यात समन्वयावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. अमेरिकेच्या यंत्रणेने सोहेल कासकरला भारताकडे न सोपवता सोडून का दिले असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

पुरावे असून निसटला कसा?

अमेरिकन तपास यंत्रणांनी सोहेल कासकर आणि दानीश अली या दोघांच्या प्रत्येक बैठकीचे स्टिंग ऑपरेशन करत त्यांच्या विरोधात आवश्यक तेवढे पुरावे गोळा केले. अमेरिकन यंत्रणांनी त्यांना एका डीलसाठी पैसेही दिले होते. त्यानंतर 2014 मध्ये अमेरिकन यंत्रणांनी सोहेल, दानिश यांना हेरॉइन ड्रग्ज व्यवहार प्रकरणात अटक केली. पूढे हे प्रकरण तपासासाठी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनकडे सोपवण्यात आले होते. सोहेल आणि दानीशसोबत हामीद चिस्ती आणि वाहब चिस्ती देखील अटक करण्यात आली होती.

12 सप्टेंबर 2018 रोजी अमेरिकेतील फेडरल न्यायालयाने सोहेल कासकरला शिक्षा सुनावली होती. सोहेलकडे भारतीय पासपोर्ट सापडला असल्याने त्याला भारताकडे सोपवण्याची तयारी सुरू केली होती. भारत आणि अमेरिका यांच्यात 2005 मध्ये झालेल्या परस्पर कायदेशीर सहाय्यक कराराच्या आधारे सोहेलला भारतात आणले जाणार होते. असे असताना सोहेल निसटला कसा, याचे गूढ कायम आहे.

Back to top button