पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढ | पुढारी

पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढ

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईसह राज्यातील पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून राज्यात गेल्या चोवीस तासांत 82 अधिकारी आणि 321 अंमलदार अशा एकूण 403 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना संक्रमित पोलिसांचा आकडा 2 हजार 497 वर पोहोचला आहे.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेतही राज्यातील पोलीस दलाला याचा फटका बसत असल्याचे चित्र सध्या आहे. गेल्या तीन दिवसांतील राज्यातील कोरोना बाधित पोलिसांची आकडेवारी पाहता यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांत अनुक्रमे 298, 370 आणि 403 अशी पोलीस कोरोना रुग्णवाढ नोंदवली गेली आहे, तर सौम्य लक्षणे असलेल्या 9 हजार 518 पोलिसांना विलगीकरणात पाठविण्यात आले आहे.

राज्य पोलीस दलात गेल्या सात दिवसांत 439 अधिकारी आणि 1 हजार 665 अंमलदार अशा एकूण 2 हजार 104 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये राज्यात आतापर्यंत 48 हजार 971 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात 6 हजार 278 पोलीस अधिकारी आणि 42 हजार 693 अंमलदारांचा समावेश आहे. कोरोनाची लागण झालेल्या 45 हजार 970 पोलिसांनी यशस्वीरीत्या कोरानावर मात केली आहे.

गेल्या चोवीस तासांत कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये मुंबई पोलीस दलातील 30 अधिकारी आणि 99 अंमलदार अशा एकूण 129 जणांचा समावेश आहे, तर कोरोनाची लागण होऊन मुंबईत आतापर्यंत सर्वाधिक 126 पोलीस मृत्यूची नोंद झाली आहे.

कोरोनाची लागण झालेल्या गेल्या चोवीस तासांतील 82 अधिकार्‍यांपैकी 77 अधिकार्‍यांनी आणि 321 अंमलदारांपैकी 273 अंमलदारांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यातील 3 अधिकारी आणि 12 अंमलदारांना दुसर्‍यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

Back to top button