मोबाईल, सोशल मीडियामुळे घटस्फोट वाढले | पुढारी

मोबाईल, सोशल मीडियामुळे घटस्फोट वाढले

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : मोबाईल आणि सोशल मीडिया पती-पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. विधी सेवा प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात राज्यात 25 हजारांहून अधिक घटस्फोटासाठी अर्ज करण्यात आले आहेत. त्यापैकी 35 टक्के प्रकरणांत घटस्फोटासाठी मोबाईल अथवा सोशल मीडियाचे कारण पुढे करण्यात आले आहे. एकट्या मुंबईत 2021 या वर्षभरात 7 हजार, तर पुण्यात 12 हजार अर्ज घटस्फोट साठी दाखल करण्यात आले आहेत.

ठाण्यातील घोडबंदर परिसरात राहणारे सीमा आणि प्रशांत (नावे बदललेली) दोघेही चांगले उच्चशिक्षित आणि नोकरी करणारे सुखी दाम्पत्य.

प्रशांत एका मल्टिनॅशनल कंपनीत पीआर हेड पदावर कार्यरत आहे. तर सीमा एका जाहिरात कंपनीत जॉब करते. सीमा आणि प्रशांतचा संसार सुरळीत सुरू असतानाच एका रात्री त्यांच्या आयुष्यात अचानक एक वादळ आले. सीमाने त्या रात्री अचानक प्रशांतचा मोबाईल चेक केला. त्यात तिला दिसले की, प्रशांत आपल्याच कार्यालयातील एका महिला सहकारीशी व्हॉट्सअ‍ॅपवरून चॅट करत असताना त्याने त्या महिला सहकारीला फ्लाईंग किसचे स्माईली पाठवले आहे. तू त्या महिलेला फ्लाईंग किसचे स्माईली का पाठवले, या कारणावरून सीमा आणि प्रशांतमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

एका महिला सहकारीला कोणीही फ्लाईंग किसचे स्माईली उगाच कसे पाठवू शकतो, असे म्हणत सीमाच्या डोक्यावर संशयाचे भूत दबा धरून बसले. त्या एकाच कारणावरून सीमा प्रशांतवर सतत संशय व्यक्त करायला लागली. तर याबाबत प्रशांतचे म्हणणे होते की, त्याच्या महिला सहकारीने त्या दिवशी एक जोक व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला होता व तो जोक त्याला आवडला, असे दाखवण्यासाठी त्यास खळखळून हसण्याचे स्माईली तिला पाठवायचे होते.

मात्र, हसण्याच्या आणि फ्लाईंग किसच्या स्माईलीमधला फरक माहिती नसल्याने आपण हसण्याच्याऐवजी फ्लाईंग किसचा स्माईली तिला पाठवला. हसण्याचा स्माईली कोणता आणि फ्लाईंग किसचा कोणता याची माहिती नव्हती एवढीच काय आपली चुकी असल्याचे प्रशांत सीमाला समजावून सांगत होता. परंतु, सीमा काहीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हती.

शेवटी तिने प्रशांतपासून दूर होण्याचा निर्णय घेतला आणि ठाणे न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने या दोघांचे म्हणणे ऐकून घेऊन दोघांना विचार करण्यासाठी 6 महिन्यांचा वेळ दिला आहे.

परस्पर संमतीने घटस्फोट घेणार्‍यांची संख्या वाढतेय

म्युच्युअल डिव्होर्स अर्थात परस्पर संमतीने घटस्फोट घेणार्‍यांची संख्या सातत्याने वाढत असून, यात मुंबई आणि पुण्याच्या पाठोपाठ नागपूरचा तिसरा क्रमांक आहे. लग्नात मानपान किंवा हुंडा दिला नाही, स्वयंपाक येत नाही, सासू-सासरे छळ करतात, अशा स्वरूपाची कारणे यापूर्वी पती-पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत होती.

मात्र, आता यात सोशल मीडियाशी संबंधित कारणेही वाढू लागली आहेत. गेल्या वर्षभरात प्राप्त झालेल्या एकूण तक्रारींपैकी जवळपास 35 टक्के तक्रारींमध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे पत्नी अथवा कुटुंबीयांकडे दुर्लक्ष या स्वरूपाची कारणे आहेत, असे विधी सेवा प्राधिकरणाच्या ठाण्यातील सूत्रांनी सांगितले.

50 टक्के जोडप्यांनी घेतला परस्पर संमतीने घटस्फोट

सोशल मीडियाच्या आहारी गेल्यामुळे पती-पत्नीच्या नात्यांत दुरावा निर्माण झाल्याच्या अनेक घटना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणासमोर आल्या आहेत. विधी सेवा प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात राज्यात घटस्फोटाची सुमारे 25 हजार प्रकरणे समोर आली असून, त्यापैकी 35 टक्के प्रकरणांत घटस्फोटासाठी सोशल मीडियाचे कारण पुढे करण्यात आले आहे.

घटस्फोट घ्यावा या मतापर्यंत पोहोचलेल्या दाम्पत्यांचे समुपदेशन करून त्यांची मने जुळवण्याचे काम या प्राधिकरणामार्फत केले जाते. गेल्या वर्षभरात या प्राधिकरणाकडे आलेल्या एकूण संख्येच्या अर्जापैकी 35 टक्के दाम्पत्यांचे यशस्वी समुपदेशन झाल्याने ते सुखाने नांदत आहेत, तर 50 टक्के जोडप्यांनी आपसी संमतीने घटस्फोट घेतला.

घटस्फोटाची कारणे बदलली

वास्तवातल्या मित्राची, मैत्रिणीची जागा हळूहळू काल्पनिक वा आभासी व्यक्ती घेत चालल्या आहेत आणि वास्तवात अशी माणसे समोर आल्यावर होणारा भ्रमनिरास नैराश्याचे, वैफल्याचे कारण होऊ लागले आहे. त्यातूनच मग नातेसंबंध दुरावण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. याचे मूर्तिमंत प्रमाण म्हणजे राज्य विधी सेवा प्राधिकरणाचा अहवाल होय.

लग्नात मानपान किंवा हुंडा दिला नाही, स्वयंपाक येत नाही, सासू-सासरे छळ करतात, अशा स्वरूपाची कारणे घटस्फोटासाठी पूर्वी असायची. मात्र आता प्रमुख कारण मोबाईल आणि सोशल मीडिया ठरले आहे.

Back to top button