राज्यातील ५ सरकारी अध्यापक महाविद्यालये बंद | पुढारी

राज्यातील ५ सरकारी अध्यापक महाविद्यालये बंद

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : पुरेशा विद्यार्थीसंख्येअभावी राज्यातील पाच अध्यापक महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात नोकरी मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने विद्यार्थ्यांनी अध्यापक महाविद्यालयांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे राज्य शासनाने रायगड, बीड, अमरावती आणि पुणे या चार जिल्ह्यांतील पाच अध्यापक महाविद्यालये बंद केली आहेत.

रायगड जिल्ह्यातील सासवणे व माणगाव, बीड जिल्ह्यातील नेकनूर, अमरावती जिल्ह्यातील अमरावती आणि पुणे जिल्ह्यातील उर्दू शासकीय अध्यापक विद्यालय बंद करण्याचा निर्णय शिक्षण उपसंचालकांनी घेतला आहे. ही महाविद्यालये बंद करण्यात येत असल्याबाबत राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही दुजोरा दिला आहे.

अध्यापक महाविद्यालय म्हणजे डी.एड. महाविद्यालयांची संख्या एक हजार शंभर इतकी होती. मात्र, गेल्या काही वर्षांत शिक्षकांची नोकर भरती झालेली नाही. त्यामुळे नोकरी मिळणार नाही, या कारणास्तव अध्यापक विद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास विद्यार्थी उत्सुक नाहीत. यामुळे राज्यातील महाविद्यालयांची संख्या 2019-20 मध्ये कमी होऊन ती 894 एवढी झाली.

आता ती आणखी आकुंचन पावत 654 एवढी झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून शासनाने खासगी अध्यापक विद्यालयांचे वेतनेतर अनुदान बंद केले आहे. त्यामुळे केवळ अनुदानासाठी महाविद्यालय चालवली जात नाहीत, तर प्रयत्न करून आणि मोफत प्रवेश देऊनही विद्यार्थी येत नसल्याने संस्थाचालक हवालदिल झाले आहेत.

Back to top button