मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबईतील विधानसभेच्या काही जागांची अदलाबदल करण्याचे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने ठरविले असून, यात चांदिवली हा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने जिंकलेला मतदारसंघ काँग्रेसला देण्यात येणार असून त्या बदल्यात वांद्रे पूर्व मतदारसंघ ठाकरे गटाला देण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे. (Uddhav Thackeray)
चांदिवली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नसीम खान यांना २०१९ च्या निवडणुकीत केवळ ४०९ मतांनी निसटता पराभव पत्करावा लागला होता. शिवसेनेचे दिलीप लांडे हे या निवडणुकीत जिंकले होते. आता दिलीप लांडे हे शिंदे गटात आहेत. तर नसीम खान यांच्यासाठी काँग्रेसने ही जागा मागितली आहे. नसीम खान हे काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य बनले आहेत. त्यामुळे काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला असून ठाकरे गटाने ही जागा काँग्रेसला सोडण्याची तयारी दाखवली आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे झिशान सिद्दीकी जिंकले होते.
पण त्यांनी आता अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ही जागा ठाकरे गटाला हवी आहे. ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई हे येथून इच्छुक आहेत. तर काँग्रेसकडून प्रवक्ते सचिन सावंत हे कामाला लागले आहेत. पण ही जागा ठाकरे गटाला देण्यात येणार आहे. भायखळा, अणुशक्ती नगर, वर्सोवा, वांद्रे पश्चिम, कुर्ला आणि चेंबूर या जागांसाठी काँग्रेस आग्रही आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यास काँग्रेसने नकार दिल्याने ठाकरे गटाने मुंबईतील जास्त जागा लढविण्याची रणनीती आखली आहे.