जिंतूर : जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव येथील तरुणाने चिट्ठी लिहून मराठा आरक्षण मिळत नसल्याचा विवंचनेतून शेतात झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना सोमवारी (दि. १६) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. किशोर ससे (वय २७) असे या तरूणाचे नाव आहे. मराठा आरक्षणासाठी तालुक्यातील हा पाचवा बळी ठरला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर तालुक्यातील मराठा आरक्षण आंदोलनात पाचेगाव अग्रस्थानी आहे. पाचेगाव येथील किशोर ससे हा गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभागी होता. मराठा आरक्षण मिळावे यासाठी किशोर याने सोमवारी शेतात झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना नातेवाईकांना समजताच पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. किशोर याने हातावर आणि चिठ्ठीत 'एक मराठा, कोटी मराठा, मी मनोज जरांगे' असे लिहीलेले आढळून आले. या घटनेची नोंद जिंतूर पोलिसांत करण्यात आली आहे.