पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: कंठेश्वर (ता. पूर्णा) येथील एका शेतकऱ्याच्या शेत आखाड्यावरून बैलगाडीसह सोयाबीनची पोती चोरून नेत शेतमजुराने पोबारा केल्याची घटना सोमवारी (दि.२६) रात्री घडली. याप्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात शेतमजुराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंबंधी अधिक माहिती अशी की, कंठेश्वर येथील शेतकरी मारोती विठ्ठलराव कदम (वय ५५ ) यांनी पाच दिवसांपूर्वी आपल्या शेतात ४५ वर्षीय प्रकाश चव्हाण याला ३०० रुपये पगारावर कामावर ठेवले होते. दरम्यान, प्रकाशने सोमवारी रात्री आखड्यावरील बैलगाडीसह ५ पोती (४ क्विंटल) सोयाबीन चोरून नेला. सुमारे १ लाख २७ हजारांचा हा मुद्देमाल होता. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नरसिंग पोमनाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण मुखेडकर करीत आहेत.