

पाथरी, पुढारी वृत्तसेवा: पाथरी शहरातील शांताबाई नखाते विद्यालयातील पिण्याच्या पाण्यासाठी बांधण्यात आलेल्या स्टॅन्ड ची भिंत कोसळून चार विद्यार्थी जखमी झाले. ही घटना आज (दि.१५) घडली. जखमी विद्यार्थ्यांना शाळा प्रशासनाने तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तर दोन विद्यार्थ्यांना पायाला दुखापत झाल्याने त्यांना परभणी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. (Parbhani News)
पाथरी येथील शिवाजी नगरातील शांताबाई नखाते विद्यालयामध्ये आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास पिण्याच्या पाण्यासाठी बांधण्यात आलेल्या स्टँडच्या भिंतीवर काही विद्यार्थी खेळत होते. यावेळी ओझाने स्टॅन्ड खाली पडले, त्याचबरोबर सिमेंट स्टॅन्ड साठी बांधण्यात आलेली भिंतही कोसळली. यामध्ये चार विद्यार्थी जखमी झाले. तातडीने विद्यार्थ्यांना पाथरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यातील दोन विद्यार्थ्यांना परभणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.